गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ...............
"जन्म देणारी माता मुल पोटात असताना नऊ महिने नऊ दिवस कधी होतील आणि केव्हा पोट
हलके होईल ह्याची वाट पहाते. चार दिवस अधिक गेले तर कधी बालंतीन होणार म्हणून
डॉक्टरांना विचारते. मुलगी असेल तर ती उपवर होताच जावयच्या हातात देऊन मोकळी
होते, आणि मुलगा असल्यास तो शिक्षण संपवून नोकरी करू लागला कि त्याला सुनेच्या
ताब्यात देऊन मोकळी होते, पण गुरुमाता मात्र आपले अनंत अपराध पोटात घालून, नाना
प्रकारे बोध करून जन्मजन्मांतरीचे संस्कार नाहीसे करते आणि भवबंधनातून सोडवून
आपणांस कायमचे सुखी करते"
आपण "माणूस जन्म - प्राणी जन्म - माणूस जन्म " अश्या भवचक्रात सापडून दुखं,
संकटे व त्रास भोगत आहोत, अश्या ह्या बिकट भवचक्रातून सुटण्यासाठी आपण फक्त आणि
फक्त मनुष्य जन्मातच देवाची कृपा संपादन करू शकतो, आणि देवाची हि कृपा संपादन
करून देण्यासाठी केवळ गुरु हे एकच समर्थ आहेत. आपण मनुष्यच काय तर, साक्षात
देवाने सुद्धा मानव अवतारात गुरु करून घेतले होते, आणि गुरुचे महत्व पटवून दिले
होते , जसे कि ....
श्री रामाचे गुरु वशिष्ठ
श्री कृष्णाचे गुरु सांदीपन
मग आपण तर फार साधी माणसे आहोत, आपल्यासाठी गुरु करून घेणे किती महत्वाचे आहे
नाहीका ? ह्यावरून सुखी जीवन जगण्यासाठी व मुक्ती मिळवून ह्या भवचक्रातून
कायमचे सुटण्यासाठी गुरुंच्या सहाय्याची, मार्गदर्शनाची फार जरुरी आहे हे कळून
येते.
भगवान विष्णूचे अवतार मानले जाणारे महर्षी व्यास यांनी
गुरुपौर्णिमेच्या दिवशी बह्मसूत्रे लिहावयास प्रारंभ केला असे मानले जाते.महर्षी
व्यासांना आद्यगुरू म्हटले जाते.आपण त्यांना ओळखतो ते महाभारताचे लेखक म्हणून.
परन्तु सार्या जगाला त्यांनी अनेकोविध धर्मग्रन्थ उपलब्ध करून दिले म्हणूनच हा
दिवस गुरु पूर्णिमा म्हणून ओळखला जातो.
आर्यावर्तातले सर्व ॠषीमुनी ह्या दिवशी चातुर्मास पाळण्यासाठी वनात जात .आजही
दिनदर्शिकेत ह्या दिवसाची नोंद सन्यासी जनांचा चातुर्मास अशी आहे.
आर्यावर्तात वेदातील ऋचा विखुरलेल्या अवस्थेत होत्या,त्या सर्व संकलित करून
त्यांची चार वेदात विभागणी करण्याचे महान कार्य त्यांनी केले. यामुळे सर्व
सामान्य जनांनाही वेदांचा ठाव लागला.यापूर्वी हे सनातन धर्माचे ज्ञान, मौखिक
परंपरेने गुरुकडून शिष्याला प्राप्त व्हायचे. त्या काळातील हा सर्वात मोठा
उद्योग असला पाहिजे.
भगवान व्यासांनी अठरा पुराणेही लिहिली. धर्मग्रंथांचे सार सूत्ररूपाने सांगून
ते शिष्याकडून पाठ करून घ्यायचे अशी त्यावेळी पद्धत होती. त्यामुळे मूळ
ग्रंथातील विचार कायम रहात असे. भागवत धर्मातील नारद भक्तीसूत्र तसेच
शांडिल्यसूत्र तसेच शटदर्शनांची न्यायसूत्रे, वैशेषिक सूत्रे, योगसूत्रे ही
त्यांची काही उदाहरणे. व्यासगुरुंनी ब्रह्मसूत्रे लिहिली असा सार्वत्रिक समज
आहे. ह्याच ब्रह्मसूत्रांना वेदांतसूत्रेही म्हणतात्.कारण वेदांचे संपूर्ण
ज्ञान ह्यात सामावले आहे. सर्व सूत्रांच्यात ती सर्वात प्रसिद्ध आहेत. ही
ब्रह्मसूत्रे ५५५ असून त्यांचे चार अध्यायात वर्गीकरण केले आहे. समन्वय,
अविरोध, साधना आणी फल.या चार विभागात अनेक पाद आहेत आणी अनेक अधिकरणे.परंतु ती
फार क्लिष्ट आहेत. त्यामुळे वेदान्तावरील भाष्याच्या शिवाय त्याचा अर्थ समजणे
कठीण आहे. उदाहरणार्थ प्रथमाध्यायात जिज्ञासाधिकरणात पहिले सूत्र आहे "अथातो
ब्रह्मजिज्ञासा."म्हणून ब्रह्माबद्दल जिज्ञासा " हे सूत्र समजण्यासाठी
जिज्ञासूला प्राथमिक माहिती असली पाहिजे. जसे नित्य अनित्य विवेक, फलत्याग्,
शट्सम्पत इत्यादी. हे लिहिण्याचे कारण एवढेच की थोडक्या शब्दात गर्भित अर्थ
किती आहे.
महर्षी व्यासांना कॄष्णद्वैपायन व्यास असेही त्यांच्या वर्णावरून ओळखले
जाते.तसेच त्यांचा जन्म बदरिकावनात झाला म्हणून त्यांना बादरायणही म्हणतात.
आद्य शंकराचार्य त्यांच्या शांकरभाष्यात महर्षी व्यासांना महाभारतकार तसेच
गीतेचे जनिते मानतात पण ब्रह्मसूत्रे बादरायणांची असे मानतात. मात्र त्यांचे
शिष्य ब्रह्मसूत्रांचे श्रेय व्यासांनाच देतात. ही ब्रह्मसूत्रे वेदांच्या आणी
उपनिषदांच्या तसेच भगवतगीतेतील भासमान विरोधाभासाचा अन्वयार्थ लावून त्यांना
योग्य त्या सन्दर्भात स्थान देऊन सर्व धर्मग्रन्थातील तत्वे एका छत्राखाली
आणण्यास यशस्वी झाली आहेत असे मानण्यास प्रत्यावाय नाही.
व्यासोच्छिष्ट्म जगत्रयम असे म्हणतात ते याच कारणासाठी तर नाहे?
गुरु ब्रम्हा! गुरु विष्णू! गुरु देवो महेश्वरा!
गुरु साक्षात परब्रमः! तस्मैश्री गुरुदेव नमः ..
"सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
No comments:
Post a Comment