जव्हार दर्शन
2 दिवस अन एक रात्र........
46 तासात 640 किमी बाईकची ट्रेकंती........
2760 मिनिटांचे जव्हार दर्शन...........
165600 सेकंद फक्त आदिवासी संस्कृतीनुभव..........
३०/११/२०१३
रोजी सकाळी ४.०० वा. विक्रम इदेसोबत थंडगार हवेचा झोत अंगावर झेलत माळशेज घाटाचा
मनात थोडासा धस्स करणारा...तितकाचा नाविन्याचा अगणित स्त्रोत ठरणारा आनंद अनुभवत
मुरबाड गाठले. तेथून कल्याण....दत्तू भवारी (दादा), रमाकांत जळवी,
भगवान नागपुरे (काका), रवी साबळे यांच्यासह भिवंडीमार्गे वाडा
गाठले. वाटेत रवीने त्याला उशीर झाला म्हणून नाष्टा दिला.....पहिल्यांदाच या भागात
आल्याने काही तरी नाविन्य मनात साठवत सर्वजण आपापला दृष्टीकोन जपत
होते.....विक्रमगड येथे वर्मा साहेब यांच्या बंगल्यावर साहित्य ठेवून लगेच
जव्हारला आगेकूच केली. कारण ईश्वर सहाणे आणि त्याचा मित्र...तसेच महेश धोडी हे
अगोदरच जव्हारला पोहचले होते आणि आमची वाट पाहत होते. जव्हार मध्ये प्रवेश
करण्यापूर्वीच तेथील राजाचा दुरूनच लक्ष्य वेधून घेणारा पुतळा दिसला. त्यावरून
जव्हारचे राजवैभव सुरु झाल्याची खात्री पटली.
जव्हार
दर्शनसाठी मोलाचे सहकार्य करणारा आतिश मुकणे याच्या सोबत आम्ही राजवाडा पाहायचा बेत
आखला कारण प्रकाश गवारी अजून यायचा होता. तो येईपर्यंत जवळचे ठिकाण घेण्याचा
निर्णय झाला आणि आम्ही राजवाडा आवारात प्रवेश केला. काजूच्या बागांनी सर्वांची मने
जिंकली. कारण या भागात शेती पाहिजे तसी विकसित झालेली नाही आणि मग पूर्वीच्या काळी
राजांना उतन्नाचे कोणते साधन होते हा प्रश्न सर्वांना पडला होता. काजूची बाग
बघितली आणि काही प्रमाणात उत्तर मिळाले. राजवाड्याचे दुरूनच दिसणारे स्तंभ मनाची
उंची वाढवत होते. येथील गौरवशाली इतिहासाची साक्ष पुरवत होते. गर्द अशा वनराईत
असणारा हा राजवाडा हा एका आदिवासी राजाचा असावा असे काही वेळ तेथील बांधकाम, कलाकुसर पाहून आश्चर्य वाटत
होते.....जणू काही भास तर होत नाही ना.....याचीही खात्री करून घेतली.
जव्हारचा
राजवाडा पाहत असताना जव्हारविषयी असणारी माहिती मला आठवू लागली आणि तिचा पडताळा मी
या मातीचा सुगंध घेवून करू लागलो.........जव्हारचे पहिले अधिपती जयबा राजे हे
शिवोपासक म्हणून त्यांनी आपला नांवातील "जय" हि पहिली दोन अद्याक्षरे
घेवून व शंकर हे आपले दैवत आपले उपासक असल्याने शंकराचे नांव "हर", हर म्हणजे शिव शंकर असे नांव आपल्या
नांवाच्या अद्याक्षरांना जोडून आपल्या मुलुखाचे नांव "जयहर" असे केले. कालांतराने
त्याचे अपभ्रंश होवून या संस्थानचे नांव "जव्हार" असे रूढ झाले.
ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील महाराष्ट्रात
असणारे एक जुने संस्थान म्हणून जव्हारची ओळख आहे. जव्हार संस्थान
अस्तित्वात असताना त्याचे क्षेत्रफळ ८०३ चौ.किमी. होते. लोकसंख्या सु. पाऊण
लाख (१९४१) व उत्पन्न सु. ९ लाख रुपये असल्याची माहिती मिळाली. ठाणे जिल्ह्याच्या ईशान्येस असणारे हे संस्थान बहुतांशी
पठारी भूप्रदेश असणारे आहे. प्रथम हे
संस्थान वारली समाजाकडे होते. त्यांच्याकडून जयाबा या आदिवासी राजाने १२९४ मध्ये मिळविले.
जयाबानंतर त्याचा मुलगा नीमशाह गादीवर आला. १३४३ मध्ये दिल्लीच्या तुघलकांनी नीमशाहाला राजा ही पदवी
दिल्यावरून नवीन शक सुरू झाला (५ जून १३४३).
तो अखेरपर्यंत जारी होता. नीमशाहनंतर सु. दोनशे वर्षांच्या काळातील इतिहास ज्ञात नाही. पोर्तुगीजांशी युद्धे करून महादेव
कोळी राजांनी वसई ते डहाणू टापूवर अंमल बसवला. १७८२
पासून पेशव्यांनी दुसऱ्या पतंगशाहावर १,००० रु. खंडणी बसवली. इंग्रज व जव्हार यांमध्ये कोणत्याही
प्रकारचा तह झालेला नव्हता. खंडणी इंग्रजांनी माफ केली (१८२२).
पण नवीन राज्याभिषेकाचा नजराणा कायम ठेवला. १८९० मध्ये संस्थानला दत्तकाचा अधिकार मिळाला. राजाला
खूनखटल्यांचा अधिकार होता. जव्हार हीच राजधानी होती व संस्थानात १०८ खेडी होती. या राज्याला स्वताचे राष्ट्रगीत होते. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्याचे पूर्ण नियंत्रण संस्थानवर
असे. स्वातंत्र्योत्तर काळात संस्थान प्रथम मुंबई प्रांतातील ठाणे जिल्हा आणि नंतर
महाराष्ट्र राज्य यांत समाविष्ट करण्यात आले.....असा
सर्व गौरवशाली इतिहास राजवाड्यासभोवतालच्या बागेत फेरफटका मारत असताना मी
आठविण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या खानाखुणा पडताळून पाहिल्या.
राजवाड्याचे वैभव न्याहाळत असताना दुपार झाली होती....म्हणून या
राजवाड्याच्या बागेत जेवण करण्याचा आम्ही बेत आखला.....घरून आणलेले तांदळाचे धिरडे
सर्वांनी राजेशाही थाटात फस्त केले.
जव्हारला पाणीपुरवठा करण्यासाठी राजाने बांधण्यात आलेला जयसागर
जलाशय आपला प्रवासाचा थकवा क्षणार्धात दूर करतो. येथील निसर्ग आणि त्यात
जलाशयाच्या बाजूला असणारा बगळ्यांचा
थवा येथील माणसाच्या
शांततेचे प्रतिक म्हणून आमच्या भोवताली बागडत होता. जलाशय बांधण्यामागे राजाची
दूरदृष्टी अनुभवयास मिळाली......विशेष म्हणजे जलाशय प्राचीन असूनही अजून कुठे
त्यातून पाणी गळती होत नाही......नाही तर आजकालची धरणे उदा. खडखड धरण
बघा...त्यातून किती पाणी गळती होते त्याचा अनुभव घ्या.
प्रकाश
गवारी....जव्हारचा एक फेसबुकचा मित्र...पहिल्यांदा भेटला. नंतर त्याच्या
मार्गदर्शनाखाली भोपातगड चढाई करण्याचा निर्णय झाला. जव्हारपासून सुमारे ....किमी
असला तरी रस्ता अधिक खराब असल्याने आम्हाला हळूहळू आगेकूच करावी लागत होती....नशीब
त्यामुळे तरी आम्हाला रस्त्यालगतचा निसर्ग....आदिवासी जीवन....घरे....लोकांचा
पेहराव....राहणीमान....शेती......व्यवसाय.....पिके....वृक्ष संपदा.....खासकरून
मनमोकळी खेळणारी मुले जवळून अनुभवता आली. सर्व काही पाहत असताना मनात एकच विचार
घोळत होता....किती स्ट्रगल करावे लागतं आहे इकडे लोकांना....आपण काय आज
आहे...उद्या निघून जाणार....पण या आदिवासी समाजाचे काय ? या मुलांचे काय ?
डोक्यावर लाकडाचा भारा घेवून धावत-पळत घराकडे जाणा-या माता-भगिनी पाहिल्या आणि मन
अगदी उदास झाले. एके काळचे श्रीमंत संस्थान म्हणून ओळख असणारे जव्हार
संस्थान.....आणि आज येथील आदिवासी समाजाची अस्तित्वाची लढाई....किती विसंगती होती.
मग या स्वातंत्र्याने यांना काय दिले. फक्त कागदावर असणारे करोडो रुपयांचे अनुदान
कि धरणांमध्ये जमिनी दडपून उध्वस्त केलेल्या पिढ्या....? कोणत्याही दृष्टीकोनातून
विचार केला तरी एकाच मुद्द्यावर मी पोहचलो होतो...ते म्हणजे अगदी नागवे करून सरकार
या माझ्या आदिवासी बांधवांना जीवनाच्या रेसमध्ये पळवत आहे.....!!!
भोपातगडाच्या
पायथ्यावरील गावात गडावर जाणा-या वाटेची चौकशी करायला एका मुलाला हाक मारली तर
लगेच तो आमच्या पुढे वाट दाखविण्यासाठी तयार झाला.....गाव बघितले तर कमी
लोकवस्तीचे...परंतु माणुसकी अगदीच ओतप्रोत असल्याची येथे जाणीव झाली....गडावर
जाणारी वाट थोडी अनवट आणि वाटेत असणा-या खड्ड्यांची होती. तसा हा नेहमीचाच अनुभव.....ज्या
गडकोटांनी आमच्यात स्वाभिमान जागवला आज ते सर्व आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत.
गडाची
वाट चालायला सुरुवात केली असता.....आजूबाजूला शेती नजरेत भरत होती....भाताचे पिक
संपल्यानंतर येथे दुसरे कोणते पिक होत असेल असे मला कुठे जाणवले नाही....सगळीकडे
उजाड माळरान बघितल्यानंतर येथील आदिवासी बांधवांची जीवनासाठीची लढाई किती खडतर आहे
याची कल्पनाही मला करवत नव्हती. गडाच्या वाटेत राम, लक्ष्मण व सीता यांची पाऊले
दगडात कोरलेली दिसली आणि क्षणार्धात माझे विचारचक्र रामायणातील उल्लेख तपासू
लागले.......
भोपतगडावर
आमचा प्रवेश नष्ट झालेल्या दरवाज्याच्या अवशेषामधून झाला. गडाला उत्तरेकडे व दक्षिणेकडे असे एकूण दोन दरवाजे दिसले.. आज हे दोन्ही दरवाजे नष्ट झालेले आहेत.
प्रवेशव्दारापाशी असणारे बुरुज कसेबसे
तग धरुन उभे आहेत. प्रवेशव्दारापाशी एक म्हसोबाची मूर्ती आहे. आत शिरल्यावर समोर हनुमानाची मूर्ती दिसली.
गडमाथा बराच विस्तीर्ण आहे. माथ्यावर
एका मोठ्या पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. या वाड्याच्या भिंती अजूनही काही ठिकाणी शिल्लक आहेत.
वाड्याच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा हौद आहे. गडावर ४ पाण्याची खोदीव टाकी आहेत. या टाक्यांजवळच एक तलाव
आहे. उन्हाळ्यात त्याचे पाणी आटत असावे. संपूर्ण गडमाथा फिरण्यास अर्धा तास लागला.
त्यानंतर सोबत आणलेला वडापावचा नाष्टा फस्त करत गडावरुन त्रिंगलवाडी, हरिहर, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा असा सर्व परिसर न्याहाळला.
गडावर
थोडासा अधिक उशीर होत असल्याची कल्पना माझ्यात मनात डोकावली आणि लगेच सर्वांना
पटकन निघण्याची सुचना केली......कारण संध्याकाळी दादडे येथील भोयेपाडा येथे
आदिवासी नृत्यविष्कार अनुभविण्यासाठी आम्हाला जायचे होते.
जव्हार
पर्यंतचा परतीचा प्रवास करत असताना सूर्य मावळतीकडे झुकलेला होता. जव्हारला आलो तर
सूर्यनारायणाने निरोप घेतलेला होता. बाबू चोथे यांना फोन करून आम्ही येत असल्याची
कल्पना दिली. त्यांनी लवकर पोहचण्याचा आग्रह धरला....परंतु रस्ता माहित नसल्याने
आणि त्यात रात्रीची वेळ असल्याने आम्हाला दादडे नंबर २ येथील भोयेपाडा येथे
पोहचण्यास संध्याकाळचे ७.३० वाजले. गावात गेल्यावर समोर दिलेला
मंडप...त्याच्याभोवतीने केलेली विद्युत रोषणाई.....गावातील जमा झालेले सर्व
आदिवासी बांधव पाहून आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो. बाबू चोथे यांच्याबरोबर ओळख
करून घेतली आणि त्यांना उशीर झाल्याबद्दल माफी मागितली. आमचे यथोचित स्वागत करून
कमळाचे फुल देवून सर्वांचा सत्कार केल्याने आम्ही सर्व भारावून गेलो. कारण
आजपर्यंत आम्ही कोणालाही ओळखत नव्हतो आणि तेही आम्हाला ओळखत नव्हते. हि पहिलीच भेट
आणि यात इतका आदर......आम्हाला अगदीच या संस्कृतीचा हेवा वाटावा असेच होते सर्व......कोणताही
उशीर न करता लगेच तारपा नृत्याला सुरुवात करण्यात आली. तारपा वाजविणारी व्यक्ती एका
वेगळ्या आवेषात तारपा वाजवून सर्वांना मंत्रमुग्ध करत होती......आणि त्या सुरावर
सर्वांनी ठेका धरला होता. आदिवासी संस्कृतीचा हा जल्लोष आम्ही सर्व प्रथमच अनुभवत
असल्याने कोणी नजरही खाली पाडत नव्हते.......अप्रतिम असा हा सोहळा नंतर गौरी
नृत्याने अधिकच बहरला......त्यानंतर तूर नाच सुरु झाला आणि मग मात्र आमचा आनंद
गगनात मावेनासा झाला. विश्वास बसत नव्हता कि इतकी गोडी या नृत्यांमध्ये ठासून
भरलेली आहे. नृत्यकाम संपल्यानंतर सर्व कलाकारांचे अभिनंदन केले....ग्रुपफोटो
क्लिक केले. अंधार अधिक असल्याने क्लिक करण्यासाठी कसरत करावी लागतं होती. बाबू चोथे
यांच्यासोबत यथोचित जेवण करून आम्ही मुक्काच्या ठिकाणी जाण्यासाठी परतीचा प्रवास
सुरु केला.....प्रत्येकाच्या ओठावर एकच म्हणणे होते....बस्स यार माणुसकी शिकायला
मिळाली. अजून किती मोठेपण हवे आपणास कोणाकडून.....!!!
दुस-या
दिवशी दाभोसा धबधबा, खडखड धरण, शिरपा माळ आणि वारली चित्रकला असा नाविन्यपूर्ण
अनुभव मनात साठवून आम्ही ठिक दु.४.०० वाजता परतीचा प्रवास सुरु केला. अजून
अनुभवण्यासारखे बरेच काही राहून गेल्याची आतिष मुकणे कल्पना करून देत
होता....परंतु प्रत्येक जण वेळेत घरी पोहचला पाहिजे हा विचार मनात ठेवून आम्ही आतिषला
एक फोटोफ्रेम गिफ्ट देवून निरोप घेतला.
एकंदरीत हा अनुभव आयुष्यभराची शिदोरी म्हणून नेहमी मनात राहील हे
नक्की...!!!
फिरस्ता
माझी
संस्कृति.....सह्यभ्रमंती !!!
No comments:
Post a Comment