Thursday, December 26, 2013

शिवस्पंदन युवा- मुहूर्तमेढ आणि प्रवास




दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या....सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. मलाही शाळेला सुट्ट्या असल्याने विशेष काही काम नव्हते. फावल्या वेळेत काही तरी केले पाहिजे असा मनात एकसारखा विचार घोळत होता. परंतु नेमके सुचत नव्हते काय करायचे. मग जयराम शिंदे यास विचारणा केली कि आपण एक दिवस विश्रामगडावर जावू सहज फिरायला. दिवस ठरविण्याचा विचार सुरूच होता......आणि आमच्या कानावर आले कि विश्रामगडावर शिवाजी महाराज यांना येवून ३३३ वर्षे पूर्ण होत असल्याच्या शुभमुहुर्तावर काही मुले २२ नोव्हेंबर २०१२ रोजी 'शिवपदस्पर्श दिन' साजरा करणार आहेत. आम्हाला एक कारण मिळाले होते....गडावर जाण्यास आम्ही उत्सुक होतोच परंतु या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्हाला आमचा संपूर्ण ग्रुप घेवून जाण्याची संधी मिळणार होती. सुरुवातीला आम्ही त्या मुलांसोबत फक्त सहभागी म्हणून जाणार होतो. परंतु दिवसागणिक आमचा सदर कार्यक्रमातील सहभाग वाढत गेला. मंडप, व्याख्याता, जेवण, कार्यक्रमपत्रिका, प्रमुख पाहुणे आदी विविध नियोजनाची जबाबदारी आमच्यावर येवून ठेपली होती. नेतृत्व करण्याची जयराम शिंदे यास पहिल्यापासून आवड होती....त्यामुळे तो काही मागे फिरून पाहत नव्हता. जयराम शिंदे आणि श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र, केळी रुम्हणवाडी, ता.अकोले येथील सर्व सेवेकरी यांच्या मदतीने आम्ही सर्व जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. केळी रुम्हणवाडी ते विश्रामगड अशा भव्य शिव Rally चे आयोजन आम्ही केले. यात परिसरातील विविध मान्यवर, कार्यकर्ते यांना निमंत्रण पत्रिका देणे, त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला समाधानकारक उत्तर देणे म्हणजे आमची एक कसोटीच होती. दिवसभर उन्हात पत्रिका वाटल्यानंतर संध्याकाळी परिसरातील सर्व गावांमध्ये कार्यक्रमाचा प्रचार करणे अशी सर्व जबाबदारी पेलताना खरच रात्री झोप येत नसे. परंतु दुस-या दिवशी पुन्हा शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होवून नव्या जोमाने काम सुरु करायचो.
दि.२२ नोव्हेंबर २०१२ रोजी सकाळी शिवाजी महाराजांचे भगवे ध्वज कोणी हातात....तर कोणी आपल्या गाडीला बांधून एकत्र जमले होते. हे चित्र पाहिले आणि आजपर्यंत केलेल्या धावपळीचा क्षीण गायब झाला. आजचा कार्यक्रम चांगला पार पडो अशी मनोमन प्रार्थना करून मी व जयराम शिंदे याने Rally चे आयोजन केले. सर्वांसाठी मोफत गडापर्यंत जाण्याची व्यवस्था असल्याने गर्दी तर खूपच जमली होती......परंतु या गर्दीला आम्ही एका विचाराने एका सामाजिक आणि ऐतिहासिक कार्याचा भाग बनविण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. लेझीम पथक व शिवाजी महाराजांची लाउडस्पीकरवर लावलेली गाणी यांनी एक शिवमय वातावरण तयार झाले होते. रस्त्याने जात असताना फुलांची बरसात करणारे शिवप्रेमी आमचा उत्साह वाढवत होते.
शिवपदस्पर्श दिन साजरा करण्यासाठी आम्ही जे आटोकाट प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांची फलप्राप्ती आणि शिवाजी महाराजांचे आशीर्वाद म्हणून कार्यक्रमासाठी सुमारे ३००० शिवप्रेमींनी हजेरी लावलेली होती. शिवपदस्पर्श दिन हा कार्यक्रम आमच्यासाठी आव्हान होते कारण याभागात असे कार्यक्रम या अगोदर फक्त राजकीय पक्षच करत आलेले आहेत...आम्हाला राजकीय स्वरूप कार्यक्रमाला येवू न देता शिवरायांचे विचार उपस्थितांच्या मनात उतरावयाचे होते. मुंबई, नाशिक, अकोले, इगतपुरी, टाकेद, घोटी, पुणे अशा विविध भागातील मान्यवर सदर कार्यक्रमासाठी आलेले होते. शेवटी सदर कार्यक्रम इतक्या उत्साहात पार पडला कि आजही त्या आठवणी आम्हाला नवनवीन काही तरी करण्याची प्रेरणा देतात. त्या कार्यक्रमानंतर जयराम शिंदे व मी शिवविचारांची ज्योत अशीच निरंतर ठेवली पाहिजे असा विचार करत होतो. यासाठी आपण नियमित शिवाजी महाराजांचे विचार जोपासले पाहिजेत आणि त्यासाठी आपण एक व्यासपीठ स्थापन केले पाहिजे असा विचार आमच्या दोघांच्या मनात डोकावला.....
काही महिन्यानंतर रतनगडावरील कातळशिल्प न्याहाळत असताना योगेश नागरे यांनी विश्रामगडावरील कार्याक्रमाच्या स्मृती सर्वांच्या मनात पुन्हा एकदा जागवल्या. योगेश नागरे हे स्वतः एक शिवव्याख्याते आहेत आणि ते सुद्धा विश्रामगडावरील कार्यक्रमामुळे आमच्याशी जोडले गेले. त्यांनी त्या स्मृती जागाविल्यानंतर आम्ही एक व्यासपीठ स्थापन करण्याच्या हेतूने 'शिवस्पंदन युवा' या आपल्या एका कुटुंबाची स्थापना केली.
या कुटुंबात सर्वजण एका व्यासपीठावर आहेत. जाती, धर्म, पंथ यांना एका समान धाग्यात गुंफण्याचे काम करण्याचा आमचा मानस आहे. आमची कर्मभूमी हि आदिवासीबहुल आणि ग्रामीण भागात असल्याने येथील बोलीभाषा, समाज, देश, संस्कृती आणि स्वराज्याचे देखणे स्वप्न उभे करणारे शिवाजी महाराज, आपल्या स्वाभिमानासाठी प्राण पणाला लावणारे शंभू राजे आणि या सर्वांचे मायेप्रमाणे संवर्धन आणि संरक्षण करणारा अमुचा सह्याद्री यांचा अभिमान जपण्याचा आमचा दृष्टीकोन आहे.

या ग्रुपमधील प्रत्येकाचे या जगावर खूप प्रेम आहे. जगातल्या प्रत्येक माणसावर...आणि माणसातल्या चांगुलपणावर.....माणसा इतकेच आमचे प्रेम आहे या निसर्गावर....आणि निसर्गातील फळे, फुले, डोंगर, द-या, पर्वत, पठारे.....नद्या, नाले....आणि रंगीबेरंगी पक्षी यांच्यावर.... हे जग सुंदर करावे...माणुसकीची नाती प्रेमाने जोडावीत ....आणि त्यातून माणसं घडावीत...जी या जगावर प्रेम करतील.या निसर्गावर प्रेम करतील...निसर्गाला जपतील...आपल्या मुलाप्रमाणे.

इथे प्रत्येकात ईश्वर आहे ...आणि आम्हाला तो दिसतो..! शहरी वातावरणापलीकडे.....निसर्गाच्या सान्निध्यात निर्मळ आनंदाचा शोध घेत आमच्या जीवनाची वाटचाल सुरु आहे. तुमच्या सहभागाने आमचे कुटुंब प्रगल्भ होईल असा आम्हाला विश्वास आहे.....!!!

आई जिजाऊची स्वराज्य स्थापनेची प्रेरणा, शिवरायांचे विचार, शंभूराजांचा करारी बाणा, गाडगे महाराजांची मुल्ये, महात्मा फुले यांचा शैक्षणिक दृष्टीकोन समाजातील आणि विशेषतः ग्रामीण आदिवासी समाजाच्या विकासाठी अत्यावश्यक आहे. त्यासाठी सह्याद्रीचे हे देखणे रूप आपल्या मुलाप्रमाणे जपणा-या या माया-बाप शेतक-यांसाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी आम्ही आमचा शिवस्पंदन युवा हा एक मार्ग निवडला आहे. याच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप, दुर्गभ्रमंती, दुर्ग स्वच्छता, सामाजिक जनजागृतीसाठी तज्ञांची व्याख्याने, राज्यातील आश्रमशाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृती माहित व्हावी यांसाठी व्याख्याने, दिवाळीमध्ये आदिवासी वस्तीमध्ये फराळ व कपडे वाटप, आध्यात्मिक मुल्ये समाजात रुजावीत म्हणून अध्यात्मिक कार्यक्रम साजरे करणे, ग्रामीण भागातील ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देणे व तेथील संस्कृती, इतिहास जगासमोर आणणे, व्यवसाय मार्गदर्शन, ग्रामीण कलांना जीवदान देणे, आदिवासी कलाकारांना प्रोत्साहन देणे अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यामातून आम्ही आमचे हे समाजाचे पांग फेडण्याचा प्रयत्न करत आहोत.

दत्तू भवारी व ईश्वर सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच आम्ही नवनवीन उपक्रम राबवत असतो. हे कार्यक्रम करत असताना लोकांच्या चेह-यावरील हास्य हेच आमचे बक्षीस असते. आमचा सामाजिक दृष्टीकोन जोपासात असताना गडवाट-प्रवास सह्याद्रीचा यांच्या सोबत दुर्गभ्रमंती करण्याचा योग आला. शिवाजी महाराजांचे विचार हे फक्त वाचण्यासाठी नसून ते प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी आहेत याचे चित्र मला या ग्रुपच्या कार्यातून दिसले. गडवाटच्या त्रिंगलवाडी व कळसुबाई येथील ट्रेकमधून अनेक सह्याद्रीच्या मावळ्यांना जवळून अनुभविण्याची संधी मिळाली. अशी चांगल्या आणि आपल्या विचारांशी मिळती-जुळती माणसे भेटली कि मग आपल्या कार्याला गती मिळते. सुहास पवार, आबासाहेब कापसे, विठ्ठल गोरे, विक्रांत गायकवाड यांच्या संपर्कात आल्याने माझा सामाजिक कार्याचा दृष्टीकोन अधिक व्यापक झाला.
मी या सह्याद्रीत फिरत असताना अनेक अनुभव आले. त्यातून मला जाणीव झाली कि सामाजिक कार्यासाठी अनेक सामाजिक आवड असणा-या ग्रुपनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. यातून आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांना नक्कीच बळ मिळेल. सह्याद्रीमध्ये गडांवर फिरत असताना इतिहासाच्या पाऊलखुणा मनात साठवत असताना माझे लक्ष्य असते ते या परिसरातील ग्रामीण जीवनावर. आजही ग्रामीण भागात अनेक क्षेत्रात काम करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याच्या इतक्यावर्षांनंतरही इथे मुलभूत गरजा कशा भागवायचा असा प्रश्न मला जाणवला. शिक्षणाने येथील समस्या सुटू शकतात. परंतु शिक्षण देणा-या शाळा या फक्त नावापुरत्याच सुरु आहेत. शाळा आहेत पण शिक्षण नाही अशी अवस्था आहे. विजेचे खांब पोहचले परंतु वीज नाही पोहचली. सरकारी दवाखाने पोहचले परंतु आरोग्य कुठेतरी गरिबीमुळे हरवले. असे नसते तर कुपोषणामुळे हजारो नवजात बालकांचा मृत्यू झालाच नसता. अशा सामाजिक प्रश्नांमध्ये माझे मन अडकल्यानंतर आपल्या परीने यासाठी प्रयत्न करावे यासाठी मी AYUSH ! Adivasi Yuva Shakti (www.adiyuva.in) यांच्यासोबत जोडलो गेलो.. आदिवासी संस्कृतीला जगासमोर प्रभावीपणे मांडण्याचे काम आयुशमार्फत केले जात आहे. आदिवासी संस्कृतीला न्याय मिळवून देण्याचे काम सचिन सातवी यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. माझा उगम ज्या संस्कृतीतला आहे त्याच संस्कृतीच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा मला आज मनस्वी आनंद आहे.
समाजातील विविध क्षेत्रात काम करण्याची गरज ओळखून आम्ही 'शिवस्पंदन युवा'च्या माध्यामातून काम करायचे असे ठरवले आहे व ज्याला जेव्हा वेळ मिळेल त्याने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचे....मग ग्रुप कोणताही असो....नाव कोणतेही असो....आपला उद्देश महत्त्वाचा आहे. असा हा शिवस्पंदन युवाचा प्रवास सुरु आहे सह्याद्रीचा मान, सन्मान, अभिमान जपण्यासाठी.....शिवरायांचे विचार जागविण्यासाठी. आज आमच्यासाठी हीच संस्कृती आहे.

या प्रवासात आम्हाला अनेक जीवाभावाचे सोबती लाभले त्या सर्वांचा नावाने इथे उल्लेख करणे शक्य नाही परंतु त्यांच्याशिवाय हा प्रवास अगदीच अशक्य होता असेच म्हणावे लागेल. आई-वडिलांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांची आपुलकीची भावना यांच्या जोरावर आम्ही उभे आहोत भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी.....!!!
हर हर महादेव
जय जिजाऊ
जय शिवराय

राजू ठोकळ
शिवस्पंदन युवा
माझी संस्कृती....सह्यभ्रमंती

No comments:

Post a Comment