Sunday, November 17, 2013

स्वर्गानुभव- ताडोबा सफारी....

स्वर्गानुभव- ताडोबा सफारी....

 

शिवस्पंदन युवा नेहमी सह्याद्रीच्या पर्वत शिखरांवर भ्रमंतीसाठी पुढाकार घेत असते. परंतु यावेळेस सातपुडा पर्वत रांगेतील पेंच, ताडोबा व नागझिरा या अभयारण्यांना भेट देण्याचे नियोजन सुमारे दोन महिने अगोदरच केले होते. कारण या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपणास आगावू आरक्षण करणे अत्यावश्यक आहे. यानुसार रेल्वे, राहणे व जेवण, तसेच प्रवासासाठी वाहन याबाबींचे नियोजन प्रविण पाटील यांनी केलेले होते.

दि.६/११/२०१३ ते १२/११/२०१३ दरम्यान आयोजित या भ्रमंतीसाठी एकूण १६ जणांचे बुकिंग केलेले होते. यात बरेच जण एकमेकांना ओळखत नव्हते...परंतु छंद एक होता, तो म्हणजे भ्रमंती. त्यामुळे ओळख नसल्याचा कुणावरही काही फरक पडणार नव्हता.

अनेक जण आम्हालाही या ट्रीपला घेवून जा असे म्हणत होते. परंतु सरासरी खर्चाचा एकूण अंदाज सांगितल्यानंतर टाळाटाळ करत होते. त्यावेळेस मला हसू येत होते. इतक्या लांब यांना फुकट कोण फिरायला घेवून जाणार ? ज्याला वेड आहे या निसर्गाचे तो याबाबी गौण मानतो.
दि.६/११/२०१३ रोजी मी सकाळीच आईची परवानगी घेवून कल्याणला दत्तू भवारी (दादा) यांच्या घरी जाण्यास निघालो. बस स्थानकावर आल्यावर सकाळी सकाळी मी इतकी मोठी Bag घेवून उभा असल्याचे पाहून अनेकांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. कारण ऐन दिवाळीत घरचे फराळ सोडून मी कुठे बाहेर जात असल्याचे अनेकांना मानवणारे नक्कीच नव्हते.
एक खाजगी जीपने कसारा येथे उतरल्यानंतर विक्रम इदेची वाट पाहत काही वेळ थांबलो. तो आल्यानंतर आम्ही दोघे १०.१० च्या ट्रेनने कल्याणला पोहचलो. तेथे दत्तू दादा आमची वाट पाहत उभा होता. उतरल्यानंतर आम्ही त्याच्या घरी गेलो. तिथे दिवाळीचा फराळ आणि नंतर जेवण केल्यानंतर राजेंद्र भांगरे याच्या सोबत आम्ही ट्रीपसाठी काही खरेदी केली. संध्याकाळचे जेवण दत्तू दादाच्या घरी करून आम्ही कल्याणला स्टेशनवर आलो. सोबत संदीप ठिगळे होता आम्हाला ट्रेनमध्ये बसवून द्यायला. तिथे हरिश चौधरी व नागपुरे काका भेटले. त्यांच्या सोबत अजून तिघेजण होतो. असा माझा एकट्याचा सुरु झालेला प्रवास आता इथे अनेकांची सोबत लाभली होती. ट्रेनआल्यानंतर आम्ही पटापट आपापल्या जागा मिळविल्या. इतक्या लांबचा हा माझा पहिलाच प्रवास होता. त्यात ट्रेनचा आणि माझा खूप कमी सहवास...त्यामुळे एक उत्सुकता होती मला या ट्रीपविषयी.....एक स्टेशन गेल्यानंतर उदय पाटील जे अगोदरच सी.एस.टी.वरून ट्रेनमध्ये बसले होते, ते आम्हाला भेटायला आले. ओळख झाली. काही गप्पा झाल्या. मग काय बराच वेळ धमाल झाली. रात्रभर सर्वजण झोपल्यानंतरही मला झोप येत नव्हती...कारण मला ट्रेनचा प्रवास पूर्णपणे अनुभवायचा होता. बराचवेळ गेल्यानंतर दत्तू दादा म्हणाला कि झोप आता आपल्याला सकाळीच फिरायला जायचे आहे. म्हणून इच्छा नसतानाही झोपलो.

सकाळी ८.३० वाजता अजनी स्टेशनला आम्ही उतरलो...जे नागपूरच्या अगोदर येते. तिथे उदय पाटील व त्यांचे कुटुंब यांच्याबरोबर ओळख झाली. त्यानंतर थोड्यावेळाने प्रविण पाटील हे एक बस घेवून आम्हाला घ्यायला आले. त्यांची तिथे ओळख झाली. एक अधिकारी पदावरील व्यक्ती आमच्यासाठी बराच वेळ देत असल्याचे पाहून मला खूप आश्चर्य वाटले.....परंतु त्यांनाही फिरण्याची खूप आवड असल्याचे मला जाणवले. बसने आम्ही सर्वजण आमदार निवास येथे आलो. तिथे प्रविण पाटील यांनी आमच्या सर्वांच्या राहण्याची व्यवस्था केलेली होती. रूमवर गेल्यानंतर सर्वजण फ्रेश झाले व लगेच प्रविण पाटील यांच्या घरी नाष्टा करण्यासाठी गेले. अगदी घरच्यांसारखे ते आमचा पाहुणचार करत होते. खरच पहिल्यांदाच एका अनोळखी व्यक्तीच्या घरी माझा इतका मोठा सन्मान केला जात होता. खरच मला हा त्यांचा स्वभाव खूपच भावला.
प्रविण पाटील यांनी आजच्या दिवसात आपणास कुठे जायचे आहे थोडक्यात कल्पना दिली. त्यांना आज वेळ नसल्याने त्यांनी आम्हाला त्याविषयी कल्पना दिली. परंतु त्यांची पत्नी व दोन मुले आमच्यासोबत येणार होती.
नाष्टा झाल्यानंतर आमचा पेंच अभयारण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला. प्रवासादरम्यान रामटेकचे प्रसिद्ध मंदिर येत असल्याने ड्रायव्हरने आमची बस रामटेकला वळवली. आजुचा सपाट असणारा प्रदेश आणि त्यातच दुरून रामटेकचे मंदिर सर्वांचे लक्ष्य वेधून घेत होते. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये जीवन जगत असताना डोंगर द-या पाहण्याची सवय...परंतु सातपुडामध्ये मात्र हा योग अतिशय दुर्मिळ....त्यामुळे रामटेकची टेकडी माझे लक्ष्य वेधत होती. रामटेकच्या मंदिराजवळ गेल्यानंतर सुरुवातीलाच माकडांनी आमचे स्वागत केले. जसजसा मी मंदिराच्या जवळ जात होतो तसतसे मंदिराच्या भिंतींवरील कोरीव काम मी अधिक बारकाईने न्याहाळत होतो. पुरातन वास्तूंच्या देखभालीवर अधिक लक्ष्य देण्याची गरज असल्याचे मला तिथेही जाणवले. मंदिराची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यावर काही ठिकाणी रंग दिल्याने विद्रूप चित्र निर्माण झाल्याने मला खूप अस्वस्थ वाटत होते. मंदिरात्तील देवदेवतांच्या मूर्तींचे दर्शन घेवून एकच मागणे मागितले कि "आजच्या प्रशासनाला या पुरातन वास्तूंची देखभाल करण्याची सदबुद्धी देवो" अशी प्रार्थना करून मी परवानगी नसतानाही काही फोटो काढले. 'येथे फोटो काढू नये' हा फलक पाहून खूप राग आला होता आणि मनात एक विचार घोळत होता कि देवदेवतांचे कॉपीराईट या हितशत्रूंना कोणी दिले ? कोणत्या धर्मग्रंथांत फोटो न काढण्याची बाब नमूद केली आहे ? आणि खरच फोटो काढण्यास जर बंदी आहे तर मग मंदिर व्यवस्थापन स्वतः सदर मंदिराचे फोटो विक्रीसाठी कसे काय ठेवते ? सगळाच बाजार......च्यायला आणि आपणही त्याला खतपाणी घालतो. जिथे फोटो काढण्यास बंदी आहे अशा तथाकथीतांच्या विचारांनी (अ)पवित्र ठिकाणी आपण उगाच गर्दी करायची नाही असे ठरवले. बाहेर आल्यानंतर सभोवतालचा परिसर न्याहाळला......विविध वृक्ष, पक्षी यांचे फोटो काढले. नशीब त्याचे कॉपीराईट नाहीत अजून.....घेतले काढून कदाचित भविष्यात त्यावरही बंदी यायची.


रामटेकचे दर्शन झाल्यानंतर पेंच अभयारण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला...मध्येच ड्रायव्हरने न विचारता बोटिंग क्लबकडे बस नेल्याने आमचा काही वेळ त्यात वाया गेल्याने जेवण करण्यासाठी असणारा वेळ आम्हाला मिळाला नाही. वेळे अभावी आम्हाला बस सुरु असतानाच जेवण घ्यावे लागले.....रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सर्वांना जेवण करताना खूप कसरत करावी लागत होती.....पण रोज घरात आईवर ओरडून हे नको ते दे.....ते नको....हे असेच...का...हि भाजी अशीच का....असे म्हणणारा मी मात्र जेवणाची आगळीवेगळी मजा अनुभवत होतो. श्रीखंड तोंडात जाण्याऐवजी कधी ते खड्ड्यात गाडी गेल्याने नाकाला लागत होते.....ते नाकाला लागलेले श्रीखंड परत पुसून खाण्यात जी मजा असते ती मी घेतली......चार भिंतीच्या आत दिवाळीचे फराळ खावून कदाचित ही मजा आली नसतीच.....रस्त्याने बस जात असताना माझे लक्ष्य सतत बाहेर खिडकीतून दिसणा-या झाडांकडे....रस्त्याने चालणा-या माणसांकडे.....त्यांचे कपडे.....त्यांचे दिसणे.....त्यांची भाषा आदी बाबींकडे होते. यावेळेस मला माझ्या कॅमे-याने खूप छान साथ दिली.....पेच अभयारण्य जवळ आल्यानंतर वातावरण थंड होत होते.....झाडांची गर्दी वाढत होती.....घरे पोरकी होत होती.....पक्षांची किलबिल दिलासा देत होती....फुलपाखरे ट्रीपच्या आनंदात रंग भरत होते.

सिल्लारी गेटच्या जवळच 'अमलतास' म्हणून वनविभागाचे कार्यालय आहे. इथे आपणास गाईड मिळतो. गाईडशिवाय आपणास या अभयारण्यात प्रवेश मिळत नाही. गाईडसोबत गेटच्या आत गेल्यानंतर एकच उत्सुकता होती कि वाघ कधी पाहायला मिळेल.....गाईडच्या म्हणण्यानुसार पेंचच्या अभयारण्यात २४ वाघ आहेत. परंतु वाघांचे दर्शन मे महिन्यात होण्याची शक्यता अधिक असते. कारण जंगलातील इतर पाणीसाठे आटल्याने पाणवठ्यावर हमखास वाघ पाणी पिण्यासाठी येतो. असे त्याने म्हणताच मला थोडेसे वाईट वाटले...परंतु इतर प्राणी तर पहायला मिळतील असे म्हटल्यावर बरे वाटले.

पेंच नदीच्या पाणलोटक्षेत्रातील जंगलात पेंच व्याघ्र प्रकल्प १९९२ साली स्थापन करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील छिंदवाडा व सिवरी जिल्ह्यातील सातपुड्यातील जंगल महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यापर्यंत भिडलेलं आहे. या व्याघ्र प्रकल्पातलं जंगल मिश्र पानगळीचं आहे. साग हा या जंगलातला मुख्य वृक्ष सर्वांच्या नजरेत भरत होता. आवळा, शिसम, सावर, पळस, शिवन, तेंदू, हळदू, साजा, बिजा, मोह, धावडा या झाडाचं अथांग भांडार पसरलेले दिसत होते. बांबूचे तर आच्छादन सगळीकडे दिसत होते.
पेंच अभयारण्यात वाघाबरोबरच बिबळे, झिपरी अस्वले, चौशिंगा, सांबर, नीलगायी, भेकरं, चितळ, रानडुकर, रानगवे,ससे, उदमांजर, शेकरू, रानमांजरे, पाणमांजरं, कोल्हे या वन्य जीवांची समृद्धी पेंचला लाभलेली आहे. अजगर, नाग, घोणस, नान्नेटी, सरडे, घोरपड, भूकासव हे सरपटणारे प्राणीसुद्धा या प्रकल्पात असल्याचे गाईडने थोडेसे घाईतच सांगितले. फुलपाखरं आणि किड्या-कीटकांची विविधता आपणास या अरण्यात अनुभवयास मिळते.
सोनपाठी सुतार, जंगली तांबट, मोर, स्वर्गीय नर्तक, पारवा, शृंगी घुबड, जंगली पिंगळा, रातवा, बुलबुल, कृष्णशीर्ष कांचन, धनेश, गिधाड, घारी, सर्प गरुड, मोर घार, ससाणे, नीळकंठ, पावश्या, कोतवाल, खाटिक हे उडतं वैभव आपणास पेंचच्या व्याघ्र प्रकल्पात दृष्टीस पडते. पेंच नदीच्या जलाशयात पाणकावळे, बदके, वंचक, वारकरी, खंड्या, बगळे, बलाक, करकोचे या पाणपक्षांची जत्राही आपणास खूप काही देवून जाते. हिवाळ्यात काही प्रवाशी पक्षीही पेंच जलाशयावर पाहावयास मिळतात. पेंचचा परिसर न्याहळत असताना गाईडच्या बोलण्याकडे माझे खूपच लक्ष्य होते. त्याच्या म्हणण्यानुसार मार्च ते जून हा पेंच प्रकल्पाला भेट देण्याचा उत्तम काळ आहे. या वनात मला दिसलेले हरणांचे कळप, माकडांचा झाडावरील धिंगाणा, मोरांचे ते तुरुतुरु पळणे, काळवीटचे झालेले उतारावरील दर्शन तसेच पाणवठ्याकडील बाजूस असलेला धबधबा आणि तिथे काढलेले ग्रुप फोटो सर्वकाही अप्रतिम होते.....त्याच्याच शेजारी उंच झाडावर उभारलेले मचाण आणि त्या मचाणावरून सभोवतालचा दिसणारा नयनरम्य निसर्ग सर्वकाही अवर्णनीय असेच होते. या ठिकाणी नदी पात्रात असणा-या दगडाची रचना सह्याद्रीतील दगडांपेक्षा नक्कीच निराळी होती. पेंचची सफर पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर असतानाच वाटेत काही पर्यटक गाडीत काही अंतर प्रवास करू द्या अशी विनंती करताना दिसले. जंगलात त्यांची गाडी बंद पडली होती....अशात तेथे मोबाईल नेटवर्क नसल्याने अडचणीत पडलेली भर...अशा वेळेस उदय पाटील यांनी त्यांना प्रवासाची परवानगी दिली.

सायंकाळी सहा वाजता सुरु झालेला नागपूर परतीचा प्रवास ९:३० वाजता पूर्ण झाला.आमदार निवासासमोरील घोटुलचे रुचकर जेवण करून सर्वजण झोपण्यास गेले....मी मात्र माझा Laptop सुरु करून दिवसभराचे फोटो पाहत पुन्हा एकदा दिवसभराच्या भ्रमंतीचा आनंद घेत होतो...शेवटी १२.३० ला मध्यरात्री मी झोपलो.
रात्री उशिरा झोपल्यानंतरही दुसरा दिवस सर्वांचा खूपच लवकर सुरु झाला होता....सर्वांना आजची उत्सुकता होती आपण आज नेमके कुठे जाणार....उमरेडचे बुकिंग होते...परंतु वेळेअभावी तिकडे न जाण्याचा ऐनवेळी निर्णय घेण्यात आला आणि आमची स्वारी ताडोबाच्या दिशेने सुरु झाली. सकाळी ९.०० आम्ही नागपूरहून ताडोबाकडे जाण्यास सुरुवात केली.....चिमूरगावातून आम्हाला डाव्याबाजुला टर्न घ्यायचा होता...परंतु वेळीच रस्ता लक्षात न आल्याने सुमारे १५ किमी आम्ही पुढे नवेवाडी गेटच्या दिशेने प्रवास केला. यात बराच वेळ गेला....त्यामुळे जेवणासाठी अपेक्षित धरलेली वेळ निघून चालली होती आणि सर्वांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. त्यामुळे तिथे रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून गाडीतच घरून बनवून आणलेले जेवण घेतले.
चिमूर गावात आल्यानंतर ताडोबा अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी कोलारा गेटची चौकशी केली...चौकशी करूनही रस्ता सापडण्यास अडचण आली...थोड्याशा प्रयत्नानंतर रस्ता सापडला....एक छोटासा बोर्ड होता....तो लवकर कोणाच्या लक्षातही येत नव्हता....परंतु त्या बोर्डचे दर्शन झाल्याने खूपच आनंद झाला. मुख्य रस्ता सोडून आता आमची बस जंगलाच्या दिशेने झेपावत होती. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली होती....कधी एकदाचे ताडोबाचे जंगल येते असे झाले होते.....लांबच्या प्रवासाला तसेही सर्वजण थोडे वैतागलेले होते....परंतु सभोवतालचा निसर्ग पाहून तो वैताग प्रकट होत नव्हता....आजूबाजूला दिसणारी सोनपिवळी भात शेती सर्वांचे लक्ष्य वेधत होती. त्यातच मध्येच पांढ-याशुभ्र रंगाची कपाशीची बोन्डेही आकर्षित करत होती....शेवटी एकदाचे बरीच चौकशी केल्यानंतर आम्ही कोलारा येथील वनविभागाच्या रेस्ट हाऊसला पोहचलो....बसमध्ये बराचवेळ बसलेले सर्वजण पटकन खाली उतरले आणि जागा मिळेल तिथे मस्त झाडांच्या सावलीत पाय पसरून बसले....सर्वांच्या चेह-यावर प्रसन्नता जाणवत होती....निसर्गमय वातावरणाने सर्वांचा प्रवासाचा थकवा गायब झाला होता.....मी सुद्धा या निसर्गाच्या पहिल्या भेटीतच प्रेमात पडलो होतो....माझ्या नजरेतून इथली फुलपाखरे काही सुटली नाहीत.....गाडीतून खाली उतरताच माझा कॅमेरा सुरु झाला होता....एक एक फुलपाखरू मी माझ्या कॅमे-याच्या नजरेतून पाहत होतो...टिपत होतो....अप्रतिम अशीच सर्व फुलपाखरे जणू काही आमच्या स्वागतासाठी इकडून तिकडे स्वच्छंदीपणे बागडत होती. मला यापेक्षा काही वेगळे दृश्य अपेक्षित नव्हते.....बराच वेळ मी फुलपाखरे क्लिक करत होतो....दत्तूदादाला सुद्धा राहवले नाही...त्यानेही आपला क्लिकक्लिकाट सुरु केला.....विक्रम इदेसुद्धा आम्हाला येवून मिळाला.....जवळच भात पिकाची कापणी करणा-या शेतक-यांचे फोटोही क्लिक केले. इथे भाताच्या पेंढ्या वाहण्याची एक वेगळी पध्दत माझ्या नजरेस पडली. एक लांब काठी प्रत्येकाच्या हातात होती...सुरुवातीला वाटले सर्वजण शिकारीला चालले आहेत कि काय ?....परंतु शेतात गेल्यानंतर प्रत्येकाने आपल्या काठीला पेंढ्या अडकवल्या आणि आरामात खळ्यामध्ये घेवून आले....खरच काहीतरी नवीन होते माझ्यासाठी.....म्हणून अधिकच जवळ जावून क्लिक केले.....शेतकरीसुद्धा आपले कोणीतरी फोटो काढत आहे म्हणून मस्त पोज देत होते...आपले फोटो आपल्यालाच पाहायला मिळणार नाहीत....याची कल्पना असूनही ते फक्त कोणीतरी फोटो काढत आहे म्हणून अधिकच जोमाने भाताच्या पेंढ्या खांद्यावर घेवून मस्त हसत होते.....आपापसात काहीतरी विनोद करत होते...भाषा वेगळी असल्याने मला काही समजले नाही.....परंतु त्यांचे हसणे मात्र माझ्या मनात खूपच खोलवर रुजले.....शेवटी उदय पाटील यांचा आवाज आला, "चला रे फ्रेश होवून घ्या...आपली रूम मिळाली आहे." आम्ही फ्रेश होईपर्यंत प्रविण पाटील यांनी जेवणाची सोय केली होती.
सर्वजण जेवणासाठी पटकन तयार होवून आले होते.....परंतु ऐनवेळेस ऑर्डर दिल्याने जेवण तयार होण्यास थोडासा उशीर लागत होता....जेवण तयार होताच....सर्वजण एकाच वेळेस टेबलावर गर्दी करत होते.....यात मात्र नागपुरे काका आपल्या मोबाईलवर क्लिक करत होते....त्यांची हि मोबाईलवर क्लिक करण्याची अदा काही औरच होती. एखाद्या कॅमे-यात नाही पण या मोबाईलमध्येच माझे क्लिक होते. बैंगन मसाला...मिक्स व्हेज...डाल फ्राय...भात...चपाती....असा मस्त आणि चवदार मेनू आणि पोटात ओरडणारे कावळे....मग काय सर्वजण तुटूनच पडले....एवढ्या जंगलात इतके रुचकर जेवण....खरच सर्वजण नेहमीपेक्षा थोडे अधिकच जेवले होते.

सायंकाळी परिसरातील भटकंतीसाठी आम्ही गेटच्या बाहेर पडलो...मचाणजवळ काही व्यक्ती काहीतरी भाजत असल्याचे आम्हाला दिसले....उत्सुकता म्हणून आम्ही त्या व्यक्तींबरोबर काही वेळ गप्पा मारल्या...ती व्यक्ती दिवसभर काम करून आलेली होती...आणि आता मासे भाजत होती....संध्याकाळी काही तरी पार्टी करावी म्हणून....तेथून पुढे आम्ही पक्षी...वृक्ष...सूर्यास्त...कधी आमचेच क्लिक करत...हसत....कोलारा गेटपर्यंत चालत आलो....तिथे चहा घेवून परतीच्या मार्गाने मुक्काच्या ठिकाणी आलो.....या परिसरात लवकर अंधार पडत असल्याचे मला जाणवले....आणि अंधारात बाहेर फिरणेही धोकादायक...जवळपास कुठेही वस्ती नाही आणि रात्रीच्या वेळेस कोणीही बाहेर फिरण्यास निघत नाही....कारण जंगली श्वापदांची भीती.

संध्याकाळच्या जेवणात मस्तपैकी पुलाववर ताव मारला....सर्वजण लवकरच झोपण्यास गेले....कारण सकाळी सहाच्या आत कोलारा गेटवर जायचे होते. त्यामुळे लवकर झोपेतून उठावे लागणार होते. मी आणि दत्तू दादा मात्र तेथील मचाणवर जाण्याचा बेत मनातल्या मनात आखत होतो.....शेवटी विक्रम, नागपुरे काका, दत्तू दादा, प्रविण पाटील यांच्यासह आम्ही अंधारात सावधपणे पावले टाकत मचाणवर पोहचलो....काय भयाण थरार होता तो...शब्दात मांडणे माझ्यासाठी तरी अशक्य आहे...रात्रीच्या त्या किर्रर्र अंधारात दूरवरून कुणाच्या तरी ओरडण्याचे येणारे आवाज...मनाला थोडेसे घाबरवत होते....परंतु आम्ही तोही निसर्गाविष्कार सुमारे दोन तास अनुभवल्यानंतर परत रुममध्ये झोपण्यासाठी आलो.
दुस-यादिवशी सर्वजण लवकर उठले होते...सर्वजण आंघोळी करून तयार झाले...जंगलात जाण्यासाठी बुक केलेल्या जिप्सी गाड्यासुद्धा हजर झाल्या होत्या. सहाच्या आत आम्ही कोलारा गेटवर पोहचलो. परंतु वन अधिका-याच्या मनमानीमुळे आमचा तिथे सुमारे एक तास वेळ वाया गेला....कारण होते..त्याला आमच्याकडून काही तरी चिरीमिरी मिळण्याची अपेक्षा होती. परंतु आम्ही काही ती पुरी केली नाही. कॅमे-याचे पाचशे रुपये शुल्क भरल्यानंतर...एक तासाने आम्हाला प्रवेश मिळाला.

१९३५ साली ताडोबा अभयारण्याची स्थापना झाली. १९५५ साली मध्यप्रदेश सरकारने त्याचं राष्ट्रीय उद्यानात रुपांतर केलं. १९६० साली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर विदर्भातील जिल्ह्यांचा महाराष्ट्रात समावेश झाला. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचाही महाराष्ट्रात समावेश करण्यात आला. ताडोबाचे एकूण क्षेत्र १२० चौरस किमी आहे. ताडोबा आणि अंधारी मिळून ६२९ चौरस किमी अरण्याचा १९९४-९५ साली व्याघ्र प्रकल्पात समावेश करण्यात आला. या व्याघ्र प्रकल्पातील अरण्ययात्रा एक आनंदयात्रा ठरते. इथे वाहनांना फिरण्यासाठी कच्चे रस्ते आहेत. मात्र फक्त २०% क्षेत्रात फिरण्यास पर्यटकांना संधी दिली जाते. सोबत गाईड मात्र घ्यावाच लागतो. वाहनाच्या खाली जमिनीवर उतरण्याची कुणालाही परवानगी दिली जात नाही. वाघ आणि अन्य जीवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आता अधिक कडक कायदेशीर नियम लागू करण्यात आले आहेत.

नोव्हेंबर ते जून या कालावधीपैकी मार्च ते जून हा ताडोबास भेट देण्याचा अधिक उत्तम काळ ठरतो. या काळात ताडोबा अरण्यातील बहुसंख्य पाणवठे आटतात. पाण्यासाठी ताडोबा तळ्यावरच वन्य जीवांना अवलंबून राहावं लागतं. उन्हाळ्यात सकाळी-सायंकाळी अनेक वन्य जीव तळ्यावर हजेरी लावतात. आपणास त्यांच सहज दर्शन घडू शकतं.

ताडोबा परिसरातील रस्त्यांवरून जिप्सीमधून फिरताना आम्हाला नीलगाय, चितळ, सांबरं हे वन्यजीव भेटले. खाली लाल माती, भोवती हिरवेगार अरण्य व वर निळे आकाश अशा निसर्गरंगांची मुक्त उधळण ताडोबात दिसली. समुद्रसपाटीपासून २१२.४५ ते ३५५.७० मीटर उंचीवरील सातपुड्यातील ताडोबा मिश्र पानगळीचे जंगल आहे.

ताडोबा जंगलातून फिरत असताना सर्वांच्या नजरा इतरत्र सैरभैर फिरत होत्या. काही तरी शोध घेत होत्या...परंतु तो शोध पुरा होत नसल्याने थोडीशी नाराजी प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवत होती. मी मात्र मस्तपैकी अरण्यातील साग, तेंदू, बांबू, बेहडा, ऐन, ऐरुची, गराडी, मोह, आवळा, आंबा, अंजन, धावडा, कढई, बेल, सावर, कवठ, हिरा, हिरडा, रोहन, अमलताश, खैर, लोखंडी पळस, लालगुंजा वेल, कावळीचा वेल, बेशरम या वृक्ष-लतावेलींनी बहरलेला ताडोबा क्लिक करत होतो. कारण फक्त वाघोबाचे दर्शन एवढेच येथे येण्याचे माझे तरी टार्गेट नव्हते.

प्रवासात जंगलात पुढे पुढे जात असताना वाटेतच झाडाझुडपातून कोतवाल, हळद्या, मराठा सुतार, सोनपाठी सुतार, कोकीळ, कस्तूर, दयाळ या पक्ष्यांची अरण्यगीतं कानाचे समाधान करत होती. याचबरोबर ताडोबात भृंगराज, टकाचोर, धनेश, नीळकंठ, नवरंग, जंगली मैना, सुगरण, मोरघार, सर्प गरुड, ससाणे, हरियाल, राखी, वटवट्या, मोर, रान खाटिक, जंगली तांबट, चंडोल, पपई मैना, हुंडी मैना, रान कोंबड्या, स्वर्गीय नर्तक या अरण्य पक्ष्यांचे वास्तव्य नजरेला खुणावून गेले. मोरांचे क्लिक करण्याची मनसोक्त मजा लुटली.

कातेझरीचा नैसर्गिक पाणवठा तर सहज नजरेत भरला. पाण्यातील वृक्षांचे प्रतिबिंब क्लिक करण्यासाठी मी थोडी कसरत करत होतो. या ठिकाणी निरीक्षण मनोरे नजरेस पडले.
ताडोबा प्रकल्पात एकूण ६९ वाघ व २५ बिबळे आहेत असे गाईडने सांगितले होते. आम्हाला उत्सुकता होती कि त्यातील एक तरी आमच्या नजरेस पडावा. परंतु ४५-५० किमी प्रवास पूर्ण झाल्यानतंरही आमची इच्छा काही पुरी झाली नव्हती. आता परतीचा प्रवास सुरु झाला होता. २० मिनिटात आम्ही गेटच्या बाहेर पडणार होतो. दत्तू दादा आणि मी मे महिन्यात परत येण्याच्या गप्पा मारत होतो. बाकीचे इतके उदास होते कि चक्क शब्दही त्यांना विकत घ्यावे लागतं होते. अशातच दूरवर जाणा-या रस्त्यावर दोन गाड्या एका पानवठ्याजवळ उभ्या असल्याचे आमच्या गाडीच्या ड्रायव्हरने पाहिले आणि अचानक गाडीचा वेग वाढविला....आम्हाला काही कळायच्या आत आम्ही एका सुंदर दृश्याच्या अगदी जवळ पोहचलो होतो. समोर थोडेसे पाणी साठलेले होते. त्या पाण्यात एक वाघीण मस्तपैकी बसलेली आमच्या नजरेस पडली आणि एकच सुरु झाला क्लिकक्लिकाट....आजूबाजूला काय सुरु आहे याचा क्षणभर मला विसर पडला होता. दहा- पंधरा मिनिटांच्या कालावधीत मी त्या वाघिणीचे वेगवेगळ्या पोजमध्ये सुमारे ३०५ क्लिक घेतले.....वाघीण थोड्या वेळाने पाण्यातून उठून रस्त्याने आरामात चालत झाडांवर आपले अंग खाजवत जंगलात दिसेनाशी झाली...शेवटच्या क्षणापर्यंत फक्त एकच काम आणि ते म्हणजे क्लिकक्लिकाट...!!!

वाघीण दिसेनाशी झाल्यानंतर मग मात्र प्रत्येकाच्या बोलण्याचा आवाज थोडा वाढला होता....बोलण्यात वाघ पाहिल्याचे स्वप्नपूर्तीचे बोल ओसंडून वाहत होते. प्रत्येकाची छाती अभिमानाने थोडीशी पुढे आली होती......बराच वेळ....जेवण झाल्यानंतरही हाच विषय सर्वांना नवनवीन कल्पना देत होता...चर्चा रंगत होती...दत्तू दादाने मोबाईलमध्ये काढलेला एक फोटो सर्वजण Whatsup वर आपल्या मित्रांना शेअर करत होते.....अशा प्रकारे व्याघ्र दर्शन झाल्याने आता काही पाहण्याची आवश्यकता नाही असेच सर्वांना वाटत होते...परंतु ठरल्याप्रमाणे आम्ही नागझिरा, नागपूरचे राम मंदिर, सीताबर्डीचे प्रसिद्ध गणेश मंदिर, अदासा गणपती मंदिर, झोपलेला मारुती मंदिर, विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे धापेवाडा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पाहिले....तेथील परिसर न्याहाळला....वर्ध्याकडे जात असताना नागपूरयेथील लक्ष्मी-नारायण मंदिर पाहिले. अप्रतिम अशी रचना आपल्या मनाला मोहिनी घातल्याशिवाय राहत नाही. सेवाग्राम आश्रमात गांधीजींच्या स्मृती मनात साठविण्याचा आमच्यातील प्रत्येकजण प्रयत्न करत होता. गांधीजींच्या विचारांचा ज्यांच्या मनावर प्रभाव आहे अशा प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी भेट द्यावा असाच हा आश्रम आहे.
शेवटच्या दिवशी फिरण्याचे कोणतेही नियोजन नव्हते. त्यामुळे सर्वजण निवांत झोपेतून उठले...आंघोळीनंतर आपापल्या साहित्याची जमवाजमव केली. प्रविण पाटील यांच्या घरी नाष्टा केल्यानंतर त्यांच्या घरासमोरील बाग अक्षरशा पिंजून काढली...प्रत्येक वनस्पतीचे फोटो काढण्याची संधी आम्ही घेतली.....सुंदर अशी बाग आपल्याही घराशेजारी असावी असे मला वाटले....जवळच असलेल्या एका पुस्तक प्रदर्शनाला आम्ही भेट दिली. खूप पुस्तके होती...पंरतु अगोदरच साहित्याचे ओझे असल्याने खरेदी करताना जरा मनाची समजूत काढली. तरी सहा पुस्तकांची मी खरेदी केली. यात खरा संभाजी, स्पंदन, प्राचीन भारतातील नाग, आदिवासी हिंदू नाही है, एक चित्रांकित ग्रंथ, शिवजयंती आदी पुस्तके घेवून आम्ही आमदार निवासमधील आमचे साहित्य उचलले आणि नागपूरच्या रेल्वे स्थानकावर आलो. तेथे बुलंद नावाचे रेल्वे इंजिन प्रेक्षणीय म्हणून ठेवलेले आहे. त्याचेही क्लिक केले कारण त्याचा फोटो लवकरच MTDC च्या वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे. नागपूरच्या पर्यटन स्थळांमध्ये त्याचाही समावेश केला जाणार आहे. प्रविण पाटील यांच्या ऑफिसमध्ये सर्व साहित्य ठेवून आम्ही के.पी.मैदानावर सुरु असणा-या रौप्य महोत्सवी कला प्रदर्शनात पोहचलो. अतिशय सुंदर असे देखावे आणि तेही पारंपरीक...प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे....सर्व काही डोळ्याचे पारणं फेडणारे होते. व्यासपीठावरील एकाच वेळेस विविध राज्यांतील कलाकारांची हजेरी....त्यांची पारंपरीक वाद्ये, बासरीचे सूर, वेशभूषा....सर्वकाही मी अगदीच अचंबित होवून पाहत होतो...क्लिक करत होतो....सांस्कृतिक कलेचा हा असा अविष्कार मला पाहायला मिळाल्याचे समाधान अगदीच मी खरच वर्णन नाही करू शकत....आणि त्यातच नाशिकच्या आदिवासी तरुणांनी सादर केलेले बोहडा नृत्य आणि प्रेक्षकांनी त्यांना दिलेला उदंड प्रतिसाद मला भावनाविवश करून गेला....प्रदर्शनातील विविध वस्तूंचे क्लिक अगदी मी पळत पळत घेत होतो कारण आता ट्रेनची वेळ झाली होती....आणि परत जाण्यासाठी मला फोन यायला सुरुवात झाली होती. असा हा सुंदर नजारा कायमचा स्मृतीत ठेवून आम्ही परतीचा प्रवास आनंदाने सुरु केला......परत या भागात येण्याची इच्छा व्यक्त करून......!!!

शिवस्पंदन युवा
माझी संस्कृती....सह्यभ्रमंती !!!

No comments:

Post a Comment