Sunday, November 17, 2013

कलाडगड- अकोल्यातील गडदुर्गांचे एक सोनेरी पान

Kalad Fort, Tal Akole, Dist Ahmednagar

कलाडगड- अकोल्यातील गडदुर्गांचे एक सोनेरी पान 
दि.१७/११/२०१३
अकोले तालुक्याला अनेक निसर्ग संपन्न गडदुर्गांचा वारसा लाभलेला आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत कळसुबाईच्या सर्वोच्च शिखराबरोबरच रतनगड, हरिश्चंद्र गड, विश्रामगड, भैरवगड, कुंजरगड आदी महत्त्वपूर्ण गड आहेत. यांच्या सोबतीलाच मुळा खो-यावर आपली करडी नजर असलेला कलाडगड अगदी एकांतात असला तरी त्याच्या सभोवताली असणारी निसर्ग सौंदर्याची खाण आपल्या दृष्टीक्षेपात आणण्यासाठी आपण एकदा तरी या किल्ल्याला भेट दिली पाहिजे.
या गडाची सरासरी उंची ११०० मी. आहे. पाचनई या हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याजवळील गावातून दिसणारा परंतु पटकन लक्षात न येणारा असाच हा दुर्ग आज मला खुणावत होता. पाचनईला लिंबू सरबत घेवून थोडीशी विचारपूस करून आम्ही पेठेच्यावाडीकडे जाणा-या रस्त्याने आगेकूच केली. गडाच्या अगदी पायथ्याजवळून आम्ही जात असताना नेमकी गडाकडे जाणारी वाट आम्हाला सापडली नाही. शेवटी काही अंतर पुढे जावून आम्हाला परत फिरावे लागले. तिथे एक घोगरे नावाची मावशी भात कापणीचे काम करत होती. तिला रस्ता विचारला असता, ती २०० मीटर चालत.....आपले काम सोडून आम्हाला गडाकडे जाणारी वाट दाखविण्यासाठी आली. आपल्या ठाकर समाजाच्या बोलीभाषेत तिने उत्कृष्टपणे रस्ता दाखविला. त्या मावशीच्या त्या मार्गदर्शनाचा खरच खूप हेवा वाटला....आपल्या हातातले काम सोडून इतके अंतर चालत ती आम्हाला रस्ता दाखविते....एका शहरी संस्कृतीला लाजवेल अशीच हि माणुसकी मला त्या मावशीकडून शिकायला मिळाली.

पाचनई हे गाव हरिश्चंद्रगडाच्या डोंगराच्या पायथ्याला वसलेले आहे. येथून तास दीडतासामध्ये चालत कलाडगडाच्या पायथ्याला आपणास पोहचता येते परंतु स्वताची गाडी असेल तर अती उत्तम आणि लवकरच रस्ताही अतिशय चांगला होण्याची शक्यता आहे. कारण सध्या येथे रस्ता दुरुस्तीचे काम सुरु आहे.

कलाडगडाचा डोंगर एकांतात वसलेला डोंगर आहे. मुळानदी आणि हरिश्चंद्रगडावरुन येणा-या मंगळगंगा या नद्याच्या मध्यस्थांनी कलाडगड उभा आहे. गडावर चढणारी पुर्व अंगाच्या वाटेशिवाय दुसरी वाट नाही. गडाच्या पायथ्याशी पाण्याचे लहानसे कुंड आहे. उन्हाळ्यामधे मात्र पाण्याचा तुटवडा जाणवत असेल असे सध्या त्या कुंडातील पाण्याची सध्यस्थिती पाहून वाटते.. गडावर जाणारी वाट ब-यापैकी मळलेली आहे. परंतु वनविभागाने गडावर जाणा-या वाटेच्या बाजूचे गवत कापलेले असल्याने वाट शोधण्यास अडचण येत नाही. गडावरच्या भैरोबाला नमन करण्यासाठी स्थानिक गावक-यांची गडावर अधून मधून हजेरी असावी कारण गडावर विविध ठिकाणी नजीकच्या काळात देव-देवतांना शेंदूर लावलेला दिसला.. तसेच परिसरातील अनेक आदिवासी बांधवांचे हे कुलदैवत आहे. घसा-याची वाट असल्याने काहीशी काळजी घेतच चढावे लागते. या वाटेवर काही कातळात कोरलेल्या खोबण्याही आहेत. काही पाय-या चढून आपण गडावर प्रवेश करतो. पायथ्यापासून साधारण ४० ते ५० मिनिटे लागतात. तो पुर्व-पश्चिम असा पसरलेला आहे. पुर्वेकडील भागात कातळ गुहा आहे. या गुहेमधे भैरोबा आहे. बाहेर नागोबा दैवत आहे. त्यासमोर साकीरवाडीच्या गावक-यांनी बसवलेली एक तांब्याची मोठी घंटा आहे. तिचा घंटानाद केला कि त्या आवाजात आतापर्यंतचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो आणि आपण आजूबाजूच्या परिसरातले निसर्ग सौदर्य अनुभवत बसतो. भैरोबाला वंदन करुन गडफेरीला निघावे. डावीकडे कडा व उजवीकडे माथा ठेवून गडाच्या पश्चिम अंगाला जाता येते. डावीकडील कड्यावर तटबंदी आहे. वाटेत पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहेत. गडाच्या पश्चिम बाजूला एक अंगठ्यासारखा सुळका आहे. गडावर गडपणाचे काही तुरळक अवशेष दिसतात. कलाडगडाच्या माथ्यावरुन हरिश्चंद्रगड, माळशेज घाट, मोरोशीचा भैरवगड, नानाचा अंगठा, साधल्या घाटाजवळचा नकटा डोंगर, कोंबडा डोंगर, आजोबाचा भव्य डोंगर, कुमशेतची लिंगी, घनचक्करचे पठार, घनचक्कर, भैरवगड, कुंजरगड तसेच कोथळ्याचा भैरवगड असा विस्तृत प्रदेश दिसतो. या डोंगराच्या सौंदर्याबरोबरच त्याचे रौद्रत्वही मनाला मोहवून टाकते. गडावरून दिसणारे पेठ्याच्यावाडीचे दर्शनही खूपच मनोवेधक दिसते. अशा प्रकारे कलाडगडाची आजची भटकंती करत असताना गडवाटचे शिलेदार आणि माझे जिवलग जातिवंत भटके मित्र विशाल नाईकवाडी, विठ्ठल गोरे, बापू पवार, राहुल गहरवाल यांची सोबत मनाला दुर्गभ्रमंतीची उर्जा देणारी ठरली. त्यांनी सोबत आणलेला दिवाळीचा फराळ, चिवडा, Maggi गडावर एकत्र बसून खाण्याची जी काही मज्जा केली तिचे नाही वर्णन करत......उगाच काहींचा जळफळाट व्हायचा. पाचनई गावात शिजवलेला मसालेभात पुढच्या ट्रेकसाठी प्रेरित करत राहील. अकोल्याच्या निसर्गवैभवाला मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांसोबत निरोप देत माघारी फिरणे तसे जड जात होते. परंतु काही नवीन करण्यासाठी हा निरोप घ्यावाच लागतो.......!!!

शिवस्पंदन युवा
माझी संस्कृती....सह्यभ्रमंती !!!

No comments:

Post a Comment