अकोले तालुका म्हटला कि आपल्या नजरेसमोर पटकन कळसूबाईचे गिरीशिखर येते. त्याच बरोबर भंडारदरा धरणाच्या आठवणी जाग्या होतात. इथून सांदण दरीला दोन रस्ते जातात. एक शेंडीच्या अलीकडून घाटघरच्या मार्गाने साम्रद गावाला जातो (२३ किमी) व दुसरा धरणाच्या पाणलोट क्षेत्राला वळसा घालून घनचक्कराच्या पदरातून रतनवाडीच्या मार्गाने साम्रदला पोहोचतो (२६ किमी).रतनवाडीच्या मार्गाने जाणारा रस्ता हा रस्ता निर्विवादपणे देखणा आहे. घनचक्कराच्या कडेने, तलावाच्या बाजूने कधी दाट झाडीतून तर कधी उघड्या आभाळाच्या साक्षीने ह रस्ता चढ उतार घेत वळणे वळणे घेत जातो. वाटेने कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगडाची रांग, बाजूलाच घनचक्कर रांग, त्याचे मुडा हे सह्याद्रीतील तिसर्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर हे रौद्र दर्शन देतात. रतनगड व खुट्टा सुळका कायमच साथीला असतात.
साम्रद ही छोटेखानी आदिवासी वाडी आहे. येथूनच सांदण दरीची वाट सुरु होते. १०/१५ मिनिटातच कातळाच्यासड्यावरून वाट दाट झाडीत शिरते...... व थोड्याच वेळात एका घळीच्या मुखाशी पोहचते. सांदण दरीचे वैशिट्य म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे.
सांदण दरीचे मुख.--
घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. दगडांनी तो बंदिस्त केल्यामुळे अतिशय निर्मळ असे ते थंडगार असे ते पाणी पिवून मन उल्ह्सित होते. घळ उतरायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीचा सोपा कातळटप्पा उतरुन आपणास आत दरीच्या नाळेत प्रवेश करता येतो.
आत दरीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसते. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ती अतिशय निरुंद नाळ नजरेस पडते. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त केलेली आहे.
पहिला कातळ्टप्पा उतरताच एका पाणसाठ्याने मार्ग अडवला जातो. साधारण १.५ फूट खोल १२/१३ फूट लांब अश्या त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून कौशल्याने मार्ग काडून पलीकडे जावे लागते. समोर तीव्र उतार पार करत असताना नाळ अधिकाधिक अरूंद होत जाते. कुठेही सपाट मार्ग नाही. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षर्शः तिथे खच पडला आहे..
थोडे अंतर पार केल्यानंतर आपला मार्ग दुसर्या मोठ्या पाणसाठयाने अडवला जातो. एका बाजूला ४.५ फूट खोल पाणी दुसर्याबाजूला ३ फूट खोल पाणी असते. हेही कधीही आटत नाही. कारण सुर्य इकडे कधीही पोहोचू शकत नाही. अतिशय थंडगार अश्या त्या पाण्यातून १७/१८ फूट लांब चालण्याचा थरार हा शब्दातीत आहे. प्रत्यक्ष अनूभवातूनच तो घ्यावा.
पाण्यातून प्रवास केल्यानंतर नाळेतून असणारा प्रवास संपत नाही. जवळ जवळ १.५ किमी अश्या ह्या अरूंद नाळेच्या टोकाशी पोहोचायला ३० /४० मिनिटे लागतात. दोहो बाजूंचे उंच उंच कातळकडे व आकाशाच्या छोट्या तुकड्यापलीकडे काहीही दिसत नाही.
शेवटी नाळेच्या टोकाशी आल्यानंतर सह्य पर्वताचे उग्र दर्शन होते होते. ३५०० फूट सरळ तुटलेले कडे व रतनगडाचा कडा येथून दिसतो. ही नाळ पुढे काही अवघड कातळारोहण टप्प्यांवरून जात करोली घाटाला जावुन मिळते. अर्थात आपणास त्या वाटेला जाता येत नाही हे सांगणे न लगे.
पावसाळ्यातील सांदणदरी |
अप्रतीम अश्या ह्या निसर्गनवलाने आपण अवाक होतो. ही अरूंद घळ पाणी व ज्वालामुखी यांच्या एकत्रीत परीणामामुळे बनली असावी. पूर्ण सांदण दरीत कधीही उन पोहोचत नाही त्यामुळे कायमच सुखद गारवा असतो.
No comments:
Post a Comment