सह्याद्री स्पंदनांना जपण्याचा एक लहानसा प्रयत्न...
'गडवाट...प्रवास सह्याद्रीचा' व 'तुंगा ट्रेकर्स' या दोन गडकिल्ले भटकंती करणा-या सोशल मीडियावरील ग्रुपच्या माध्यमातून वेळात वेळ काढून नित्यनियमाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीची दिवाळी सह्याद्रीतील सोयी सुविधांनी वंचित अशा एखाद्या गावात साजरी करण्यात यावी या विचारातून हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेल्या अकोले तालुक्यातील 'पेठेचीवाडी' या आदिवासी लोकवस्ती असलेल्या गावाची निवड करण्यात आली.
पाचनई गावातून पुढे जाणाऱ्या रस्त्याने 8 किमी पुढे गेल्यावर घनदाट जंगलात लपून बसलेलं एक टुमदार छोटेखानी गाव दिसतं. हे गाव म्हणजे पेठेचीवाडी, अकोले तालुक्यातील पश्चिमेस कोकणकड्याच्या बाजूचे शेवटचे गाव. इतिहासाचे अनेक पुरावे ज्या गावात आजही मिळू शकतात असे हे गाव, परंतु आज पर्यंत सरकारी योजनांची वानवा आपणास पहावयास मिळते. गावात जाण्यासाठी नीट रस्ता नाही. वीज तर पोहोचलीय परंतु तीही फक्त सिंगल फेज...म्हणजे फक्त बल्ब पेटणार बाकी पिठाची गिरणी किंवा पाण्याची मोटर त्यावर चालणार नाही. त्यातही पावसाळ्यात कधी तरी वीज चमकते. ज्या गावाच्या कुशीत प्रवरा नदीचा उगम झाला व आज त्या नदीमुळे अनेक साखर कारखाने व शहरे उदयास आली, त्या पेठेचीवाडी गावात पिण्याच्या पाण्याचे भीषण दुर्भिक्ष जाणवते. एखादा माणूस आजारी पडला, तर राजूर किंवा इतर ठिकाणी नेण्यासाठी कोणतीही प्रवासाची सोय नाही. आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर असल्याचे चित्र इथे गेल्यानंतर समजते. गरोदर स्त्रियांना कोणत्या यातनांचा सामना करावा लागत असेल याची कल्पनाही करवत नाही. पावसाळ्यात तर येथील लोकांच्या समस्यांत कमालीची वाढ होते. धो धो कोसळणारा पाऊस व अंगाला झोंबणारा थंडगार वारा येथील माणसाला अधिक काटक बनवतो. धुक्यामध्ये बहुतांशी येथील परिसर दिसत नाही. ज्या पशुपालन व्यवसायावर आपले पोट येथील आदिवासी बांधव भरत असतात, त्या जनावरांचा मृत्यू पावसाळ्यात होतो. रेशन व रॉकेल आणण्यासाठी पायपीट करत पाचनईला जावे लागते. मुळात रोजगार नसल्याने खिशात दमडीही येत नसल्याने कोणतीही खरेदी करणे अशक्य होते.
स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात याच गावात हिरे, मानकांची मोठी बाजारपेठ होती म्हणून या गावाला 'पेठेचीवाडी' हे नाव पडले असे काही जाणकार सांगतात. कोणत्याही प्रकारची वाहतुकीची साधने नसताना या गावाला जुन्नर व राजूर या महत्त्वाच्या बाजारपेठांना जोडण्याचे महत्त्व लाभलेले होते.
डॉ.नितीन बस्ते |
महाराष्ट्रभरातून सामाजिक आवड असलेले अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी जमले होते. बाळू फोडसे याने गावातील सर्वांना आपल्या समस्या पूर्णपणे आम्ही सोडवू शकणार नाही, परंतु आमच्या प्रयत्नातून तुमच्या जीवनात या उपक्रमाच्या माध्यमातून थोडाफार प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहोत असे मत व्यक्त केले. विवेक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, सह्याद्रीच्या डोंगररांगात अशी अनेक खेडी आहेत की तिथे सोयी आणि सुविधांची प्रचंड कमतरता आहे. परंतु आता तुमच्या समस्या, अडचणी, दैनंदिन जीवनातील प्रश्न जगासमोर आणण्यासाठी आम्ही येथून पुढे प्रयत्न करणार आहोत. यामुळे सामाजिक कार्याची आवड असणारी माणसं आपल्याकडे येऊन आपणास मदत करू शकतील. एस.एम.बी.टी. हॉस्पिटल कवडदरा, ता.इगतपुरी येथे कार्यरत असलेले डॉ.नितीन बस्ते यांनी लोकांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा मोफत पुरविण्याचे आश्वासन दिले.
बाळू फोडसे |
पंचायत समिती अकोलेचे उपसभापती मा.मारुती मेंगाळ यांनी पेठेचीवाडी या गावातील लोकांना खूपच मोठ्या प्रमाणात आपले जीवन जगताना संघर्ष करावा लागत आहे व यात प्रशासन कोणत्याही प्रकारची सकारात्मक पावले उचलत नसल्याची खंत व्यक्त केली. परंतु पुढील काळात आपल्या मुलांना शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी पाठवून त्यांना विविध क्षेत्रात समाजाचे प्रतिनिधित्व करण्यास पालकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
विवेकपाटील (तुंगा ट्रेकर्स) |
स्थानिक लोकांशी युवा नेते सतीश भांगरे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनमोकळा संवाद साधला. लोकांनी आपल्या समस्या मांडताना पिण्याचे पाणी, रस्ता, वाहतुकीची सोय, दवाखाना, वीज, रोजगार व शिक्षण याविषयी चिंता व्यक्त केली. तसेच पशुपालन व्यवसाय करताना वनविभागाकडून त्रास होत असल्याने व जगण्याचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती अनेकांनी दिली. आमदार, खासदार किंवा इतर राजकीय व्यक्ती अनेकदा गावाला भेटी द्यायला येतात. अशाच प्रकारे चर्चा करतात. परंतु गावातून निघून गेल्यावर आमचं जगणं जैसे थे असते. आम्हाला जगण्यासाठी एखादा मार्ग सुचवा अशी आर्त हाक स्थानिकांनी दिली.
अकोले पंचायत समितीचे उपसभापती मारुती मेंगाळ |
युवा नेते सतीश भांगरे आपले मनोगत व्यक्त करताना |
ह्या वर्षीची दिलवाली दिवाळी साजरी करताना गावातील 52 कुटुंबातील 150 महिलांना साड्या व लुगडे यांचे वाटप करण्यात आले. तसेच 350 लोकांना दिवाळीचे फराळ व गृहउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या गावात पहिली ते चौथीपर्यंत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शहरातील सुखवस्तू कुटुंबातून येऊन या गावातील लोकांसोबत काही क्षण व्यतीत करून त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचा प्रयत्न करणारा हा उपक्रम गावात घेतल्याबद्दल स्थानिकांनी उपस्थितांचे आभार मानले.
सामाजिक कार्यकर्ते भरत मेंगाळ |
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना मान्यवर |
कार्यक्रमानंतर भटक्यांची पंढरी म्हणून ओळखला जाणा-या हरिश्चंद्रगडावर भ्रमंती आणि मंदीरासमोरील प्रांगणात दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भटकंती दरम्यान गडावरील प्लॅस्टिक व बाटल्या यांची स्वच्छता करण्यात आली.
दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सर यांना श्रद्धांजली अर्पण करताना गडवाटकरी |
www.rajuthokal.com
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे भेट द्या..
No comments:
Post a Comment