Thursday, June 06, 2013

निसर्गाशी नातं.....

निसर्गाशी नातं.....

Photo: निसर्गाशी नातं.....

काहितरी विलक्षण… वेगळं…. या आधी कधी न झालेलं…. पुन्हा न होणारं... किती किती घडतं असतं या जगात!!! अगदी साधसं उदाहरण द्यायचं तर दोन भिन्न व्यक्ती एकाच वेळेस एकमेकांकडे पहाणं हा ही काय दरवेळेस योगायोग असतो….. नजरेत नजरेने क्षणभर बांधलं जाणंही किती सुंदर असतं…. अकल्पित, निर्हेतूक, स्वच्छ, पारदर्शक स्फटिकासारखं हास्य एखाद्या चेहेऱ्यावर पाहिलं की दिवस कसा लख्ख उजाडतो!!! त्या चेह्ऱ्याचं, हास्याचं प्रतिबिंब नकळत पाहणाऱ्या चेहेऱ्यावर अलगद उमटतं…. सत्य-सत्य म्हणतो आपण पण वाटतं खरच सत्याशी आहे का आपली अगदी नुसती तोंडओळख तरी??

सुर्य उगवलाय….वारा वहातोय….आज माझ्या आकाशातल्या ढगांनी रंग, रुप, आकार नी जागाही बदललीये…. समुद्रात लाटांचं कधी सनईच्या तालावर, कधी तबल्यावर तर कधी अगदी डिस्कोच्या तालावर आपल्याच नादातलं नृत्य रंगलय…..एक माणूस सोडला तर बाकि निसर्ग रमलाय त्या उत्सवात…कोण जाणे वारा क्षणभर गुंतलाही असेल त्या लाटांच्या पदन्यासात….नव्हे अगदी गोल गोल फिरलाही असेल त्याच तालावर….. वादळ,चक्रीवादळ वगैरे नावं माणसासाठीची नाही का!!! कुठल्यातरी झाडाने जुन्या पानांचा ड्रेस बदललाय तर कुठल्यातरी झाडाची जरा पोक्तं पानं नव्या छोटूल्या कोवळ्या हिरव्या पानांच्या स्वागतासाठी डोलताहेत… वाऱ्यालाही आमंत्रण आहे या सोहळ्यासाठी…. तो ही अगदी हळूवार वाहतोय…. सगळं स्थिर आहे....सगळं बदलतय!!! कदाचित निसर्ग म्हणत असेल कोणी माझी दखल घेत नाहीये… माझ्या परवानगीशिवाय अवघ्या सृष्टीत कोणाचंही काही चालत नाहीये!! हेच आहे एक ’गमतीदार सत्य’ !!! अवकाशाच्या अथांग पसाऱ्यातलं माझं अस्तित्वं ’नगण्य’!! माझी किंमत सगळ्यात जास्त कोणाच्या लेखी तर ती माझ्या स्वत:च्या…. बाकि कोणाला वेळ नाहीये स्वत:ची किंमत करायला…. ते रमलेत आयूष्याच्या सोहळ्यात!!!

माझ्या अनूभवांची अनूभूती फक्त माझीच आणि समोरच्या व्यक्तीच्या अनूभवांच सौंदर्य त्याच्या नजरेला टिपता येतय….. कितीही प्रयासाने प्रसंगाच वर्णन करा सगळे क्षण नाही पुन्हा तसेच्या तसे उभे होत…. आयूष्य आणि नाटक यातला हाच काय तो मुलभूत फरक… आणि हीच खरी गंमतही आणि तोकडेपणही!! तरिही नित्य नव्याने येणाऱ्या अनूभवांच्या सौंदर्यात कुठे बाधा येते…..

माणसाच्या लहानपणी असते नाही का नाळ जोडलेली सृष्टीशी…. प्रवासातही अगदी वादावाद्या करून हवी असते खिडकीची जागा…. भराभरा मागे पळणारी झाडं, हिरवी हिरवी शेतं, लाल कौलाची शेतातली टुमदार घरं, बैलगाडीच्या बाजूला एक उभा बैल न एक निवांत बसलेला बैल, बाजूची विहीर असो की शेत नांगरणारा शेतकरी आणि त्याची बायको असो…. सगळं अगदी समरसून, डोळ्यातून भणाण वाऱ्याने काढलेल्या पाण्याला विसरून पहायचं असतं!! मोठे मग रागावून विचारतात, “ काय पहायचय रे खिडकीतून ??” … उत्तर ठरलेलं असतं… खिडकीतून पहायचीये “गंमत” !!!

मातीतही हात घालायचा असतो तेव्हा, नखांत माती जाऊ द्यायची असते…. हायजिन बियजिन सगळं पुढे येतं… विज्ञानाचं पुस्तकं हातात येतं…. हेल्थ वगैरे समजतं पण ’गंमत’ मात्र हरवत जाते!!!
प्रवासात मग कानाला काहितरी बांधलं जातं…. आजाराचं निमित्तं नको म्हणे!!! वारा अबोल होतो मग…. त्याच्याशी गुजगोष्टी बंद होतात….एक हळवा संवाद खुंटतो!! मातीत हात-पाय मग जाईनासे होतात….. दुकानांतल्या नवनव्या गोष्टी , विज्ञानाचे नित्यनव्याने येणारे अविष्कार मन रमवू पहातात, माणसाचं मोठेपण त्याच्याकडच्या सामानाच्या दर्जाने लहानमोठं होऊ लागतं आणि लहानपणी मातीत रूतलेल्या पायाचा ठसा कसा न किती बदललाय हे तेव्ह्ढे माहित नसते……

निसर्गापासून फारकत घेतल्याचं दु:ख काही ठिकाणी होतं तर काही ठिकाणी ते ही होईनासं होतं…. निसर्गाशी केली पाहिजे मैत्री कोण समजावणार न कोणाला…. “नॅचरल प्रोडक्ट्स” आनंदाने वापरणारी माणसं nature शी सोयरंसुतकं नसल्यागत वागतात….. झाडं, पानं, फुलं, वारा, नदी, समुद्र, आकाश, तारे-तारका, चंद्र, सुर्य हे सखेसोयरे गृहित धरलेले असतात…..
स्वत:शी, स्वत्वाशी संबंध असणे म्हणजेच निसर्ग; अनं…. झाडं नाही बुवा कधी दुसऱ्या झाडाच्या वाढीमूळे दु:खी होत….. आपलं अस्तित्व वाढण्यासाठी आहे, मोहक पाना-फुला-फळांच्या बहरासाठी आहे हे झाडं नाही विसरत …. हाच तर ’निसर्ग’ !! दोन प्राणी पळत असतील तर पहिला नाही दुसऱ्याच्या पायात पाय अडकवत…. बिचाऱ्यांना ’हेल्दी कॉम्पिटिशन’ किंवा ’निकोप स्पर्धा’ हे शब्दच माहित नसतात ना!!!
मग एक विचार किंवा प्रश्न येतो की आपणच का असे ’शापित’ ??? चार दिवसाची जोडून सुट्टी आली की एरवी ’वेळ नसणारी- बिझी’ मंडळी पळतात निसर्गाच्या सानिध्यात वगैरे…..रोजच्या रस्त्यावरून जेव्हा ही वरात प्रवासाला निघते, तेव्हा नेहेमीच्या वाटेवरची झाडं जोरात सळसळतात…. मिश्किल हसतही असावीत…. एकमेकांच्या कानात कुजबूजत असावी “ याला म्हणे निसर्गाची ओढ आहे…. आपला क्रमतरी पाहिला असेल होय याने कधी क्षणभर थांबून!!!”

आपण फार कोणी महान नाही हे निसर्गाच्या सगळ्या घटकांना समजतं आणि सगळ्यात हुशार असल्याचा दावा करणारे आपण का असे परक्यासारखे , पाहूण्य़ासारखे वागतो हेच कधी कधी समजेनासे होते….. आपल्याच जुन्या गावी जावे तर ओळखीची जमीन सापडणे महामुश्किल होऊन जातेय…. जिथे तिथे उंच इमारतींची रांगोळी घातलेली दिसते….ओळखीचे आकाश जिथे नाही तिथे ’माणसांची’ ओळख न लागणे ह्यात नवल ते कुठले???
गंमत आहे सगळी…. अलिप्तपणे पाहू म्हटलं सगळ्याकडे तरी न पाहू देणारी… खूप प्रश्न विचारणारी, विचारात, कोड्यात टाकणारी…. अनेक जाब विचारणारी…. प्रसंगी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारी…..
मोठं होण्याचा ध्यास सोडावा वाटतोय हल्ली…. ’लहान’ होण्यात, असण्यात उलट जास्त ’गंमत’ आहे … न जाणो हातातून निसटलेले ’गंमतीचे’ क्षण पुन्हा भेटतील…. वाळूचा खोपा करावा…. एकाने या बाजूने एकाने त्या बाजूने… कधीतरी चुकावा तर कधी भेटावा हात हाताला …. गवताच्या पात्याचा थंडगार स्पर्श व्हावा गालाला, एसीच्या वाऱ्याला शिणलेल्या गात्रा गात्राला मग नवा तजेला मिळावा…. माठातून पाणी प्यावे…. नदीच्या पात्रात पाय सोडून शांत बसावे…. शेताच्या बांधावर झुणका-भाकरी खावी , हाताने फोडलेला कांदा मात्र न विसरता घ्यावा…. शेजारच्या काकूंनी हातातल्या वाटीत काहितरी मस्त झाकून आणावे, हॉटेलमधल्या मोठ्ठ्या बिलाच्या मेन्य़ुपेक्षा त्या अन्नाची लज्जत जास्त वाटावी…. लोड शेडींग नकोच पण अचानक लाईट जावे… भातूकलीची ’गंमत’ असावी….उन्हाळा-पावसाळा- हिवाळ्याला भरभरून अनूभवावं….

यादी करायला बसलं तर जाणवतं किती लहान आहे सुखाची व्याख्या…. मागण्याही खूप मोठ्या नाहीत…. ’शहाणं’ नाही ’वेडं’ च व्हावं…. बांधावर झाडाच्या सावलीत मस्तपैकी झोपलेल्या शेतकऱ्याला प्रश्न विचारणाऱ्या ’श्रीमंत’ माणसालाच एकदा अनेक प्रश्न विचारावे…. आयूष्यात उरलीये का खरच ’गंमत’ याचं खरंखूरं उत्तर मागावं त्याच्याकडे!!!

प्रत्येकाने निदान आपल्या पुरतं तरी आपलं जमिनीशी नातं जपावं …. निसर्गात रुजावं, समरस व्हावं… एकरूप व्हावं…. धकाधकी, व्यग्रता अमूक न ढमूक कारणांची सुट्टी करावी…… जन्माला आलेला प्रत्येक जीव ठराविक काळ हातात घेऊन आलाय, व्यस्त-व्यग्र लोकांच्या वाटे शेवटी आली चंदनाची लाकडं न साध्या सुध्या व्यक्तीला साधीशीच लाकडं तरी फरक काय न कसा पडणार…. त्यापेक्षा आयूष्याचंच सुगंधी चंदन झालं पाहिजे नव्हे केलं पाहिजे नाही का त्यातच आहे खरी ’गंमत’ !!!

मस्त पावसाळी हवा असावी… हिरवागार सभोवताल असावा, प्रवास सुरू असावा मग धावतो विचारांचा प्रवाह एक हा असा…. शेवटी वाटतं 'सोचो तुमने क्या पाया ईन्सा होके' ऐवजी नक्की क्या क्या खोया याचा ताळेबंद मांडला की मिळतील अनेक प्रश्नांची, समस्यांची उत्तरं, नाही का ??

No comments:

Post a Comment