साद सह्याद्री...नाद सह्याद्री !!!
पावसाळ्यात जायलाच हवं असं ठिकाण म्हणजे माळशेज घाट.अलौकिक हिरवाळलेले सह्याद्रीचे डोंगरकडे, त्यातून डोकावणारे दुधाळ पाण्याचे फेसाळणारे धबधबे, ढगांचा सुखद स्पर्श, हलकासा गारवा, घाटाच्या धुकाटातून दिसणारा काळाभोर वळणदार रस्ता, हे सारं आणि असं बरंच काही पाहायचं असेल, तर माळशेज घाटासारखी दुसरी जागा नाही.
धुंद हवा
भासे पाऊस हा नवा
माळशेजचा गारवा
वेड लावी जीवा !!!
निसर्गदेवतेच्या प्रसन्नतेचा ओला गंध अनुभवायचा असेल तर ओतूर पासून जवळच असणारा माळशेज घाट आपण अनुभवायलाच हवा. यावर्षी अचानक दरडी कोसळल्यामुळे थोडासा धोका निर्माण झाला होता....परंतु थोडीसी काळजी घेतली तर निसर्गाच्या या आविष्काराची अविट गोडी आपणास मनमुराद चाखायला मिळते.
ऑगष्ट महिन्यात सध्या ढगांची छत्री दूर होवून ऊन पडत आहे. या सोनसळी प्रकाशात डोंगराखालच्या शेतांच्या तळ्या-मळ्यात पाण्याचं चमचमणारं रूप वेड लावतं. पाणी भरलेली अन शेतक-याच्या घामातून साकारलेली भातशेतीची खाचरं, हिरव्या रंगाचे लुसलुशीत गालिचे, त्यात नुकतीच हिरवळीतून डोकावणारी रानफुलं हे सारं विलोभनीय आहे.
डोंगरकड्यांच्या कातळभिंतीवरून खाली फेसाळत येणारे धबधबे म्हणजे माळशेजचं वैभव. अनेक लहान-मोठे धबधबे या परिसरात आपले लक्ष्य वेधून घेतात. त्यात मध्येच कोसळणा-या श्रावणसरींचं खाली झेपावणं, आदळत-आपटत येताना त्याचं दुधाच्या धारांमध्ये झालेलं रंगांतर हे सारं आपलं मन प्रफुल्लीत करतं.
धुक्याच्या दुलईत आपले अभिजात सौंदर्य
लपविणा-या माळशेज घाटात आणखी एक निसर्गनवल आभाळातून भुईवर अवतरतं.
खिरेश्वर-खुबी या परिसरातील डबक्यांमध्ये, चिखलात भक्ष्य शोधत हिंडणारे
रोहित किंवा अग्निपंख अर्थात 'फ्लेमिंगो' पाहिल्यानंतर मन प्रफुल्लीत होते.
हे देखणे पक्षी शेकडोंच्या थव्याने सध्या इथे अवतरलेले आहेत. हे देखणे
द्विजगण पाहण्यासाठी मात्र आपणास चिखल तुडवत इकडं-तिकडं फिरावं लागतं. या
नितांतसुंदर पक्ष्यांचं साधं दिसणंही मनमोहक असतं.
No comments:
Post a Comment