आश्रमशाळा
by Raju Thokal
आश्रमशाळाही आमच्याच...येथील समस्याही आमच्याच....
विद्यार्थीही आमचेच.....पालकही आमचेच.....
चित्र तर आमचेच आहे...पण तक्रारीही आम्हीच करतोय....
शिक्षकही आमचेच.....अध्ययनही आमचेच.....
ज्ञान भांडार आमचेच असताना त्याचा प्रत्यक्ष वापर होत नसल्याने अज्ञानही जपतोय आम्हीच.....
निधीही आमचाच.....अधिकारीही आमचेच....
संघटनाही आमच्याच....आंदोलनेही आमचीच....
सर्वकाही आमचेच आणि सर्व प्रयत्नही आमच्यासाठीच......परंतु यातील समस्याही आमच्याच पाठी कायम पाचवीला का पुजलेल्या आहेत हे प्रश्नही आमचेच.......
देशही आमचाच.....नेतेही आमचेच......
समाजविकासाचा जगनरथ वाहून नेणारेही आमचेच पांढरपोषी नेते पण तरीही आज आम्हाला आमच्या हक्कांसाठी झुंज द्यावी लागत आहे. आजचा आदिवासी उद्याचा आपला कर्दनकाळ ठरू नये म्हणून कि काय आमच्या विकासात आडकाठी आणणारे खिसेभरुही आमचेच.......
निसर्गही आमचाच.....शिवनेरीवरील कोळी चौथराही आमचाच.....
क्रांतिकारी इतिहासाचे द्योतक आमच्याच समाजात तरीही लाचारी करावी लागतेय आम्हालाच
....आमच्या हक्काच्या जमिनींसाठी......
बलात्कार झेलणारेही आम्हीच....बलात्कार पाहणारेही आम्हीच....
अन्यायाची जाणीव होईल इतपत शिक्षण आमच्या आश्रमशाळांनी कसेही का होईना आमच्या ओटीत टाकले....काहींनी त्यातून आपल्या जीवनाचे सोने केले.....तो सोन्याचा मुकुटही आमचाच....पण तरीही आमचे रक्त कितीही अन्याय बघितला तरी का पेटत नाही हा निरागस प्रश्नहि आमचाच.....
धरणातील जमिनी आमच्याच.....त्यामुळे उपाशीपोटी निजतो आम्हीच.....
धरणग्रस्त आज जगण्याच्या स्पर्धेत झालेत एड्सग्रस्त.....याची जाणीवही फक्त आम्हालाच.....त्याच्या मरणासन्न यातनाही फक्त आम्हालाच......
आदिवासी खातेही आमचेच...त्यातील योजनाही आमच्याच....
आदिवासी विकासाच्या नावाखाली या खात्यातील सुटा-बुटातील मंडळी आम्हालाच खातात....तेव्हा जगावे कि मरावे ? हा प्रश्नही पडतो आम्हालाच.....
आमच्याच समस्या.....भांडवल बनताहेत खाणा-यांसाठी यासारखे दुर्दैवही आमचेच.......
'बे'चा पाढा कुठेतरी पूर्ण होतो...आमचा समस्यांचा गाडा मात्र अखंड धावतच असतो....
आता फक्त डोळ्यात आहेत अश्रू.....लेखणीतून मांडतोय दुखाश्रू....बस्स हे पातकही आमच्याच हातून.....आमच्याच हातून......!!!
©www.rajuthokal.com
No comments:
Post a Comment