Showing posts with label My Pen. Show all posts
Showing posts with label My Pen. Show all posts

Friday, December 19, 2014

टाळले सा-यांनी

टाळले सा-यांनी....

टाळले सा-यांनी सदा
तरी आर्ततेने सांगणे माझे
जाळले पुतळे आमचे
अस्तित्वाचे गा-हाणे माझे

आरक्षणाच्या लढ्यात
झाकाळले जगणे माझे
उद्याच्या पीढ़ीचे भविष्य
हक्कांसाठी भांडणे माझे

मोडला अनेकदा डाव
घटनेशी बोलणे माझे
हरवला आमचा न्याय
समाजासाठी लढ़णे माझे

सुर्याचा अस्त अचानक
विचारांचा दिवा पेटविणे माझे
घुसखोरविरोधी लढ्यात उतरा
श्वासागणिक विनविणे माझे

वास्तवाचे भान जाणत्यांना
तरी नासविले जीवन गाणे माझे
हत्यारांची मर्यादा लढ्याला
तरी तो उम्बरा ओलांडणे माझे

कधी न केला काही गुन्हा
तरी सजा भोगणे माझे
सत्याची कास संस्कृतीला
आज वादळाशी झुंजणे माझे

-राजू ठोकळ
www.rajuthokal.com

Tuesday, December 16, 2014

माझा अभिमान...

माझा अभिमान....

आमची कला
आमचा अभिमान
आमची जमिन
आमचा स्वाभिमान

आमची संस्कृती
आमचा अभिमान
आमची प्रकृती
आमचा स्वाभिमान

आमची बोली
आमचा अभिमान
आमची झोपड़ी
आमचा स्वाभिमान

आमची माणसं
आमचा अभिमान
आमची कणसं
आमचा स्वाभिमान

आमचा निसर्ग
आमचा अभिमान
आमचा धर्म
आमचा स्वाभिमान

आमचा मूलनिवासी
आमचा अभिमान
आमचा आदिवासी
आमचा स्वाभिमान

Lets do it together.

www.jago.adiyuva.in

Saturday, November 29, 2014

वारस एकलव्याचा मी

वारस एकलव्याचा मी...
by राजू ठोकळ

मूलनिवासी गडी रांगडा
सातपुड्याचे गुणगान मी
तापी नर्मदा भीलवाडचा
वारस एकलव्याचा मी...

दंडकारण्याच्या वैभवातील
शबरीचा बटवा मी
शबर, किरात, निषाद सांगे
वारस एकलव्याचा मी...

तपकिरी वर्ण, जबड़ा हसरा
मानवतेचा गोल चेहरा मी
पीळदार शरीर हरणासंगे
वारस एकलव्याचा मी...

साडी चोळी आखुड पदर डोई
भिलाट्यान्चा शृंगार मी
लाकडाची मोळी बोले
वारस एकलव्याचा मी...

मावची, गामीत, गावितांचे
शेतीभोवतालचे गाव मी
बरडे भिल्ल जागल्यांचा
वारस एकलव्याचा मी...

पाडवींच्या वास्तव्याचा
सदाबहार पहाड़ मी
वळवींच्या आदिम कलांचा
वारस एकलव्याचा मी...

वसाहती गावच्या भावनांचा
वसावा, तडवी मी
गावकुसाच्या माय-बापाचा
वारस एकलव्याचा मी...

निष्णांत तीरंदाजीची
बळीराजाची जमात मी
ब्रिटिशांनी कलंकित केलेला
वारस एकलव्याचा मी...

झाडपाला कंदमुळान्चे गुण
मासेमारीत निपुण मी
निशाणा तीर कामठ्याचा
वारस एकलव्याचा मी...

महुआच्या तेलाचा ठेवा
फळान्ची बेगमी मी
गोड मधाचा रानमेवा
वारस एकलव्याचा मी...

पाच महिण्याच्या गर्भपाताचा
गुन्ह्याच्या शिक्षेचा रीवाज मी
सुईणीचे मात्रुतुल्य बाळन्तपण
वारस एकलव्याचा मी...

यहामोगीच्या श्रध्येचा
निसर्ग अविष्कार मी
हिवारीयाच्या आशीर्वादाचा
वारस एकलव्याचा मी...

आदिवासी लेकरांचा
ज्ञानभांडार मी
विज्ञान युगातील पाखरांचा
वारस एकलव्याचा मी...

बाणावरती खोचलेल्या प्रेमाची
सर्वांगसुंदर कविता मी
आदिवासी नृत्याविष्कारांचा
वारस एकलव्याचा मी...

तंट्या मामाच्या यल्गाराची
क्रांतीची ज्वाला मी
आदिवासी उलगुलानाचा
वारस एकलव्याचा मी...

आदिम अस्तित्व जपणारा
भिल्लवीर शिल्पत राजा मी
माती माझी राखणार
वारस एकलव्याचा मी...

धर्मांध नीच द्रोणाचे
उड़वणार शीर मी
घुसखोर आर्य गाडणार
वारस एकलव्याचा मी...

वाडी वस्ती पाड्यातील
आंदोलनाची धार मी
तलवार तळपती लेखणी
वारस एकलव्याचा मी...

रंजल्या गांजल्या पीडितांचा
विद्रोही आदिवासी मी
समता न्याय बंधुत्ववादी
वारस एकलव्याचा मी...

©www.rajuthokal.com
®www.jago.adiyuva.in

Monday, November 24, 2014

माझा आदिवासी रंग

माझा आदिवासी रंग
by raju thokal

जीवनाच्या प्रवासात
क्षणभर मी थांबलो
विचारांशी थोड़ा भांडलो...
घटकाभर ती भयाण शांतता
विश्वासासोबत चालली
चालण्याच्या या मार्गात
पण का कुणास ठावुक
मनात शंकेची पाल चुकचुकली
दबक्या पावलांच्या पाठलागाची
स्पंदनं मी अनुभवली
अगदी सहज वळुन मी बघितले
या माझ्या नेत्र नयनांनी
हेरले मी अचूक त्याला
सजला होता नक्षत्रांनी
यातच होता मातीचा सुगंध
यातच होती माझी ओळख
यात दिसला माझा ध्यास
माझ्या जगण्याचा श्वास
"माझा  आदिवासी रंग"

©www.rajuthokal.com

राजू ठोकळ

AYUSH! Adivasi Yuva Shakti

www.jago.adiyuva.in

माझीया गावात...

माझीया गावात
by Raju Thokal

माझीया गावात
होती प्रकृती नांदत
माझीया घरात
होती संस्कृती आनंदात
प्रगतीच्या नादात
हरवले सारे 'मी'पणात

माझीया गावात
होते विचार नांदत
माझीया घरात
होते आचार आनंदात
योजनांच्या नादात
हरवले सारे भ्रष्टाचारात

माझीया गावात
होती माणुसकी नांदत
माझीया घरात
होती आपुलकी आनंदात
संगणकाच्या नादात
हरवले सारे मायाजालात

माझीया गावात
होता निसर्ग नांदत
माझीया घरात
होती तुळस आनंदात
सिमेंटच्या नादात
हरवले सारे बंगल्यात

माझीया गावात
होती कणसरी नांदत
माझीया घरात
होते सणवार आनंदात
प्रदुषणाच्या नादात
हरवले सारे कँलेंडरात

माझीया गावात
होते साहित्य नांदत
माझीया घरात
होते संगीत आनंदात
मोबाईलच्या नादात
हरवले सारे फेसबुकात

माझीया गावात
होती जनता नांदत
माझीया घरात
होती ममता आनंदात
स्पर्धेच्या नादात
हरवले सारे पैशात

माझीया गावात
होते संस्कार नांदत
माझीया घरात
होते शब्दालंकार आनंदात
इंग्रजीच्या नादात
हरवले सारे गुणपत्रकात

माझीया गावात
होत्या परंपरा नांदत
माझीया घरात
होत्या कला आनंदात
कारखानदारीच्या नादात
हरवले सारे शहरात

माझीया गावात
होती फळे-फुले नांदत
माझीया घरात
होती मुले आनंदात
टिव्हीच्या नादात
हरवले सारे कार्टूनात

माझीया गावात
होती ऊब घोंगडीची नांदत
माझीया घरात
होती धांदुक फड़की आनंदात
फँशनच्या नादात
हरवले सारे साडीच्या पदरात

माझीया गावात
होते स्वातंत्र्य नांदत
माझीया घरात
होती क्रांती आनंदात
जातीपातीच्या नादात
हरवले सारे आदिवासी वीर इतिहासात

माझीया गावात
होता मूलनिवासी नांदत
माझीया घरात
होता आदिवासी आनंदात
घटनेच्या नादात
हरवले सारे आरक्षणात

©www.rajuthokal.com

राजू ठोकळ

आयुश!आदिवासी युवा शक्ती

माझ्या कविता

image

Saturday, November 22, 2014

आम्ही आदिवासी

आम्ही आदिवासी
by raju thokal

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
निसर्ग सौंदर्याचे पूजक आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
अथांग सागराच्या लाटा आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
वारली चित्रकलेतील वास्तव आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
कड़ेकपारित जगण्याची धडपड आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
कातळातुन झेपावणारा आत्मविश्वास आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
स्वातंत्र्यासाठी सांडलेले कण कण रक्त आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मुलनिवासी
कनसरीच्या गितातिल सुर आम्ही 

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
वाघ बारसीचे गोपाळ आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मुलनिवासी
मुखवट्यान्च्या नाचाचा बोहडा  आम्ही 

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
रानात बहरलेली स्वच्छंदी फुले आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
 कपाळी माती घामाचे लेकरू आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
पावसाळा झेलणारी घोंगडीची ऊब आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
नशिबाच्या छाताडावर फुललेला संसार आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
भातलावणीचा चिखल आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
बोली भाषेचा अभिमान आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
सर्व संस्कारांचे मुळ आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
ख-या इतिहासाची स्पंदनं आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
या भूमिचे नायक आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
या धरतीचे मालक आम्ही

©www.rajuthokal.com

मस्त झोपलाय आदिवासी

मस्त झोपलाय आदिवासी...
by Raju Thokal

मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
संस्कृती जतनाचे विचार इथे फाडफाड बोलू नका
सिमेंटच्या जंगलातील आदिवासी रानात आणू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

ठेकेदार माजलेत, माजू दे
आदिवासी बहिणींवर हात टाकत आहेत, टाकू दे
अंगावरचे पांघरून उगाचच ओढू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

खायला नसले तरी चालेल...योजना खा
समजत नसले तरी बेहतर...पैसे घेवून मतदान करती
योजनांसोबत प्रगतीची उगा स्वप्ने रंगवू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

आश्रमशाळेत नाव पोरगं घरीच....वाईट काय
पीत रहा दिवस आणि...नाईट काय
सारेच धुंद आहेत ग्लास त्यांचे फोडू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

पाणी-पुरवठा योजना नेत्याच्या घरीच.....पाणी पिवूच नका
आरोग्य केंद्र दारी, पण डॉक्टर शहरी....आजारी पडू नका
मरणाचीच वाट पहा उगा आदिवासी जोडू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

प्रगती आमच्या नेत्यांचीच....स्वतासाठी काही मागू नका
आदिवासी खातेच आम्हाला खातंय....दुख मानू नका
कंबराचे सोडून आता डोक्याला बांधू  नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

विकासासाठी आक्रमक आग्रही बनू नका
नाराजीने नक्षलवादाचा मार्ग तुम्ही निवडू नका
एकी आणि नेकीचे बळ आहे उद्विग्न तुम्ही होवू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

©www.rajuthokal.com

raajoo thokal

AYUSH । Adivasi Yuva Shakti

आश्रमशाळा

आश्रमशाळा
by Raju Thokal

आश्रमशाळाही आमच्याच...येथील समस्याही आमच्याच....

विद्यार्थीही आमचेच.....पालकही आमचेच.....

चित्र तर आमचेच आहे...पण तक्रारीही आम्हीच करतोय....

शिक्षकही आमचेच.....अध्ययनही आमचेच.....

ज्ञान भांडार आमचेच असताना त्याचा प्रत्यक्ष वापर होत नसल्याने अज्ञानही जपतोय आम्हीच.....

निधीही आमचाच.....अधिकारीही आमचेच....

संघटनाही आमच्याच....आंदोलनेही आमचीच....

सर्वकाही आमचेच आणि सर्व प्रयत्नही आमच्यासाठीच......परंतु यातील समस्याही आमच्याच पाठी कायम पाचवीला का पुजलेल्या आहेत हे प्रश्नही आमचेच.......

देशही आमचाच.....नेतेही आमचेच......

समाजविकासाचा जगनरथ वाहून नेणारेही आमचेच पांढरपोषी नेते पण तरीही आज आम्हाला आमच्या हक्कांसाठी झुंज द्यावी लागत आहे. आजचा आदिवासी उद्याचा आपला कर्दनकाळ ठरू नये म्हणून कि काय आमच्या विकासात आडकाठी आणणारे खिसेभरुही आमचेच.......

निसर्गही आमचाच.....शिवनेरीवरील कोळी चौथराही आमचाच.....

क्रांतिकारी इतिहासाचे द्योतक आमच्याच समाजात तरीही लाचारी करावी लागतेय आम्हालाच
....आमच्या हक्काच्या जमिनींसाठी......

बलात्कार झेलणारेही आम्हीच....बलात्कार पाहणारेही आम्हीच....

अन्यायाची जाणीव होईल इतपत शिक्षण आमच्या आश्रमशाळांनी कसेही का होईना आमच्या ओटीत टाकले....काहींनी त्यातून आपल्या जीवनाचे सोने केले.....तो सोन्याचा मुकुटही आमचाच....पण तरीही आमचे रक्त कितीही अन्याय बघितला तरी का पेटत नाही हा निरागस प्रश्नहि आमचाच.....

धरणातील जमिनी आमच्याच.....त्यामुळे उपाशीपोटी निजतो आम्हीच.....

धरणग्रस्त आज जगण्याच्या स्पर्धेत झालेत एड्सग्रस्त.....याची जाणीवही फक्त आम्हालाच.....त्याच्या मरणासन्न यातनाही फक्त आम्हालाच......

आदिवासी खातेही आमचेच...त्यातील योजनाही आमच्याच....

आदिवासी विकासाच्या नावाखाली या खात्यातील सुटा-बुटातील मंडळी आम्हालाच खातात....तेव्हा जगावे कि मरावे ? हा प्रश्नही पडतो आम्हालाच.....

आमच्याच समस्या.....भांडवल बनताहेत खाणा-यांसाठी यासारखे दुर्दैवही आमचेच.......

'बे'चा पाढा कुठेतरी पूर्ण होतो...आमचा समस्यांचा गाडा मात्र अखंड धावतच असतो....

आता फक्त डोळ्यात आहेत अश्रू.....लेखणीतून मांडतोय दुखाश्रू....बस्स हे पातकही आमच्याच हातून.....आमच्याच हातून......!!!

©www.rajuthokal.com

यल्गार

यल्गार...
by raju thokal

मन माझे सदैव धावते
रानभरारी वा-यागत
कधी या छतावर
तर कधी त्या छाताडावर
विश्वास नसला जरी या जगाला
असा विश्वास जपतोय मनातला...

आयुष्याच्या वाटेवर
काट्या-कुट्यातुन शोधीत आशा
रानावनांतील जीवांसाठी जगणं
अखेरच्या श्वासाचं हेच मागणं
अट्टहास जरी वाटे हा जगाला
असा अट्टहास जपतोय मनातला...

साक्ष ठेवुनी निसर्गाची
प्रेमाचे अंकुर सदा सजवलेत
नकोत आभूषणं शब्दांची
साथ हवीय नवक्रांतीची 
निर्धार वाटे जरी पोरखेळ जगाला
असा निर्धार जपतोय मनातला....

माणसांच्या ह्रदयातील श्रीमंतिला
वस्त्रांचा इथे दुर्मिळ साज
संस्कृतीने नटलेला आहे समाज
नाचतो तारप्याच्या सुर गंधात
हा आदिवासी परका या जगाला
असा आदिवासी जपतोय मनातला....

नसताना कोणताच गुन्हा
खोट्या जबानीचा सपाटा
कायद्याच्या या दरबारात
हरवला मूलनिवासी घटनेच्या पानांत
जरी न्यायाची फिकिर  नसे जगाला
असा न्याय जपतोय मनातला....

पारतंत्र्याच्या काळ्या ढगांखाली
आदिम इतिहास रक्तरंजित गौरवशाली
भडव्यांच्या कलमने पुसला
अभिमान क्रान्तिविरांचा वैभवशाली
जरी या यल्गाराची जाण नसे जगाला
असा यल्गार जपतोय मनातला....

©www.rajuthokal.com

Monday, November 17, 2014

कृषि विकास

कृषी विकास
-राजू ठोकळ

कुठून केव्हा येतील
अच्छे दिन
वाट पाहून रोज
शेतकरी झाला दीन

माझा बाप
एकटा नाही
असंतोषाच्या आगीत
रोज जळते लोकशाही

दुबळ्या विकासाच्या गप्पांत
काळीज माझं फाटतं
शेतीमालाच्या संकटांत
नशीब मेलं फुटकं

गरीबी-जुलुमाचे
राजकारण कळु लागले
मान-सन्मानाचे
बळीचं राज्य जळु लागले

झेंडे आणि तोंडं
सत्तेत सारेच बदलले
विकासाच्या अजेंड्यात
शेतक-याला मात्र विसरले

आत्महत्त्येच्या विचाराने
हैराण सारी माती
लाखो हातांच्या एल्गाराची
कुठे हरवली नीति?

निसर्गाच्या लहरीपणागत
सरकारी योजनांचा खेळ सारा
माय-बापाच्या अस्तित्वासाठी
चला देवू कृषि विकासाचा नारा

©www.rajuthokal.com

"शेतकरी जगला तर देश टिकेल"

राजू ठोकळ

facebook

हा उजेड आदिवासी मनातला

उजेड आदिवासी मनातला...
-राजू ठोकळ

नदी    नाल्यांच्या    प्रवाहात
खेकड़ी दगडाखाली शोधताना
अनेकदा अडकली बोटे
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

करवंदाच्या जाळीमधली
काळी मैना तोड़ताना
अनेकदा रुतले काटे
तरी मज वाटे हवा हवा
हां उजेड आदिवासी मनातला

गुडघे गुडघे चिखलात
भात लावणी करताना
अनेकदा झोडपले पावसाने
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

कौलारू पहाड़ी घरात
कुडाच्या भिंती सारवताना
अनेकदा शेणही गेले तोंडात
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

सोन-पिवळ्या शेतात
पिकांची कापणी करताना
अनेकदा रक्ताळली बोटे
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

वडिलांच्या कोपरीच्या खिशात
घामाची दमड़ी शोधताना
अनेकदा रीते झाले हात
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

घराच्या हक्काच्या अंगणात
रात्री चांदण्या मोजताना
अनेकदा स्वप्नांची सोडली साथ
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

दुनियेचा महासागरात
भविष्याची स्वप्ने रंगवताना
अनेक खाल्ल्या ठेचा
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

©www.rajuthokal.com

राजू ठोकळ