मस्त झोपलाय आदिवासी...
by Raju Thokal
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
संस्कृती जतनाचे विचार इथे फाडफाड बोलू नका
सिमेंटच्या जंगलातील आदिवासी रानात आणू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
ठेकेदार माजलेत, माजू दे
आदिवासी बहिणींवर हात टाकत आहेत, टाकू दे
अंगावरचे पांघरून उगाचच ओढू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
खायला नसले तरी चालेल...योजना खा
समजत नसले तरी बेहतर...पैसे घेवून मतदान करती
योजनांसोबत प्रगतीची उगा स्वप्ने रंगवू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
आश्रमशाळेत नाव पोरगं घरीच....वाईट काय
पीत रहा दिवस आणि...नाईट काय
सारेच धुंद आहेत ग्लास त्यांचे फोडू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
पाणी-पुरवठा योजना नेत्याच्या घरीच.....पाणी पिवूच नका
आरोग्य केंद्र दारी, पण डॉक्टर शहरी....आजारी पडू नका
मरणाचीच वाट पहा उगा आदिवासी जोडू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
प्रगती आमच्या नेत्यांचीच....स्वतासाठी काही मागू नका
आदिवासी खातेच आम्हाला खातंय....दुख मानू नका
कंबराचे सोडून आता डोक्याला बांधू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
विकासासाठी आक्रमक आग्रही बनू नका
नाराजीने नक्षलवादाचा मार्ग तुम्ही निवडू नका
एकी आणि नेकीचे बळ आहे उद्विग्न तुम्ही होवू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
©www.rajuthokal.com
No comments:
Post a Comment