Showing posts with label Tribal Culture. Show all posts
Showing posts with label Tribal Culture. Show all posts

Sunday, December 14, 2014

कुपोषण...

कुपोषण....

दोन वेळच्या पोटाचा
प्रश्न सदैव उभा राही
फळे-कंदमुळेही
कुपोषणाला उत्तर नाही

हिसकावले वैभव सारे
योजनांचे गर्भित इशारे
वनजमिनी हक्कहि
धुळिस मिळाले सारे

आदिवासी विकास
कोण्या विभागाने भोगले
योजनांच्या कागदावर
अधिकारी बेणे जगले

कुत्सित वास्तवात
सिक्षान आज नासले
हजारो पिढ्यान्चे
लोणी भडव्यांनी लाटले

कोवळ्या फुलांना
यांना मजूर बनवायचे
समारंभात हरामखोरान्च्या
उघडे नागडे नाचवायचे

मंत्री महोदय आमचे
खुर्चिच्या लालसेत भड़वे
पक्षाच्या आदेशावर
वाट्टेल तसे नाचती गाढवे

शिपाई-कारकुन
हीच ती काय कमाई
शिक्षक अन इतर साले
कसले सरकारचे जावई

कुठे कुठे नाही
समाजाची कुस जपलेली
शहरात गेलेली कुत्री
झालीत मोकाट माजलेली

ऊंची ऐशो आरामात
डोळे असून आन्धळे सारे
पाशवी अन्यायाच्या बातम्यांत
आदिवासींना समजती बिचारे

पै पैच्या हिशोबाचे
झाले सर्व उत्तराधिकारी
निसर्गाच्या पूजा-याची
कोणी घेईना जबाबदारी

निरास मनाचा टाहो
स्वकियांच्या हरामीपणाशी भांडतो
लुटेरे तर नित्याचेच
पण आमच्याच तत्त्वान्ना  छेडतो

कला, बोली, संस्कृती
वाटतात विचार कमीपणाचे
आरक्षणाच्या फायद्यात हेच
सर्वात पुढे बाराबोड्याचे

कायद्याच्या तराजुत
आमचे वजन पडत नाही
न्यायाच्या लढाईत
नक्षलवाद कधी जिंकत नाही

उलगुलानच्या ना-याला
तो मनातला बिरसा जागवा
मूलनिवासी धर्माला
आपल्या मनात जगवा

चार अक्षरांची
झाली कुठे आता ओळख
देवू जोमाचा आम्ही लढा
भेदु कुपोषणाचा काळोख

-विद्रोही आदिवासी

Saturday, December 06, 2014

आदिवासी साहित्य आणि अस्मितावेध


दिवंगत आदिवासी कवी भुजंग मेश्राम यांच्या समग्र साहित्याचा समावेश असलेले 'आदिवासी साहित्य आणि अस्मितावेध' हे पुस्तक आहे. आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक प्रश्नांची मार्मिक मांडणी करणाऱ्या या पुस्तकाला प्रसिद्ध कवी प्रफुल्ल शिलेदार यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे, या प्रस्तावनेतील काही अंश...
.....

भुजंग मेश्राम यांच्या 'आदिवासी साहित्य आणि अस्मितावेध' या पुस्तकाचे तीन विभाग केले आहेत. पहिला विभाग भुजंग मेश्राम यांची आदिवासी साहित्य संमेलनातील भाषणे, आदिवासी साहित्यासंबंधीचे लेख यांचा आहे. दुसरा भाग दलित साहित्यविचार असा आहे. भुजंग मेश्राम यांनी दलित साहित्य आणि आदिवासी साहित्य यांतील आंतरसंबंधांबाबत अत्यंत स्पष्ट भूमिका घेऊन लिहिलेले असल्याचे आपल्याला दिसून येते. तिसरा भाग गोंडी भाषाविचार असा आहे. पहिल्या भागात मांडलेल्या वैचारिक भूमिकेचे एक प्रकारे उपयोजन आपल्याला येथे आढळून येईल. परिशिष्टामध्ये त्यांच्या मूळ गोंडी कवितांचा मराठी भाषांतरांसह अंतर्भाव केलेला आहे. सोबतच त्यांनी केलेले काही रेड इंडियन कवींच्या कवितांचे अनुवादही दिलेले आहेत. या विभागांतून भुजंग मेश्रामांची वैचारिक जडणघडण व त्यांच्या विचारचक्राची दिशा आपल्याला स्पष्टपणे दिसून येतेच. यासोबतच आदिवासी साहित्य आणि आदिवासींचे जीवन या बाबतीत असलेल्या त्यांच्या आस्थेच्या तीव्रतेचा अंदाजही वाचकांना येऊ शकतो.

'आदिवासी कविता' या शीर्षकाने भुजंग मेश्राम यांनी त्यांचा गोंडी भाषेतील कवितांचा छोटेखानी संग्रह, ते विद्यार्थीदशेत असताना साधारणत: १९७९ साली प्रकाशित केला होता हे फारच थोडया लोकांना माहिती आहे. या संग्रहातील कविता त्यांच्या मराठी कवितांच्या वाचकांनी पाहिल्या असण्याचीही शक्यता कमीच आहे. पुढे विस्तार पावलेल्या त्यांच्या कवितेच्या एकूण व्याक्तिंमत्त्वाची बीजे आपल्याला या संग्रहात ठळकपणे दिसून येतात.

भुजंग मेश्राम यांच्या 'ऊलगुलान' या संग्रहात गोंडी, परधानी, गोरमाटी कविता व त्यांनी स्वत: केलेले त्यांचे अनुवाद आहेत. त्यानंतरच्या 'अभुजमाड' या संग्रहातदेखील कोकणी मोमिनी, वऱ्हाडी, बंबइया बोलीतील कविता आहेत. त्यांची कविता बोलीभाषेतून लोकजीवनाचा अर्क आपल्यात मुरवून घेत भाषिकदृष्टया संपन्न होत होती.

'आदिवासी कविता' या संग्रहातील गोंडी भाषेतील कवितांचा मराठी अनुवाद करण्याचे अवघड काम गडचिरोलीचे तरुण कवी राजेश मडावी यांनी आनंदाने स्वीकारले. या कामी भुजंग मेश्राम यांचे निकटचे मित्र कवी प्रभू राजगडकर यांची मदत झाली. या पुस्तकाच्या निमित्ताने 'आदिवासी कविता' या संग्रहाचा मराठी अनुवाद झाल्याने आता भुजंग मेश्राम यांचे संपूर्ण कविता लेखन मराठीत उपलब्ध झालेले आहे. भुजंग मेश्रामांची कविता ही मराठी कवितेच्या मध्यप्रवाहातली महत्त्वाची कविता आहे. खरेतर आपण या कवितेची पुरेशी नीट दखल घेण्यात कमी पडत आहोत. चांगल्या कवितेची सगळी भाषिक, भावनिक आणि बौध्दिक लक्षणे सामाजिक बिंबासह या कवितेत आहेत. सदरहू गोंडी कवितांचे अनुवाद वाचताना ही कविता उगमापाशीदेखील एक सशक्त कविताच होती हे आपल्याला प्रकर्षाने जाणवेल.
...

भुजंग मेश्राम यांचे हे वैचारिक गद्यलेखन अनन्यसाधारण आहे. त्यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातल्या एका छोटयाशा आदिवासी पाडयात झाला. आश्रमशाळेत प्राथमिक शिक्षण, नांदेडला महाविद्यालयीन शिक्षण आणि पुढील शिक्षण व नोकरी मुंबई या महानगरात झाली. यांचा मुद्दाम उल्लेख याकरता करतो आहे कारण त्यातून भुजंग मेश्राम यांच्या अनुभवविश्वाचा व्यापक आवाका लक्षात यावा. त्यांच्या 'ऊलगुलान' व 'अभुजमाड' या दोन्ही कवितासंग्रहांमधून त्यांच्या अनुभवविश्वाचे व वैचारिक आवाक्याचे दर्शन घडतेच. प्रस्तुत ग्रंथातील लेखांमधून या कवितांमागील कवीची मनोभूमी कशाप्रकारे तयार झाली होती हे दिसून येते.

भुजंग मेश्रामांच्या व्याक्तिंमत्त्वात एक अस्सल आदिम आदिवासीपण होते. त्यात एक संशोधकदेखील दडलेला होता; जो आपले कार्य सतत करत होता. त्यांच्यातल्या या संशोधकामुळे त्यांचे वाचन चौफेर झाले होते. प्रस्तुत पुस्तकातील अनेक लेखांमधून आपल्याला अनेक भारतीय भाषांमधलेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय साहित्यातलेदेखील संदर्भ समर्पकपणे आलेले दिसून येतात. त्यांच्या संशोधन वृत्तीमागच्या प्रेरणा दोन प्रकारच्या होत्या. एक तर त्यांना स्वत:ची मुळे शोधायची प्रचंड ओढ होती. त्याकरता त्यांनी जगभरातल्या आदिवासी साहित्याचा आणि आदिवासीविषयक लेखनाचा संग्रह केला होता. त्यांचे वाचन, प्रसंगी अनुवादही करणे सतत सुरू होते. या आत्मशोधाच्या प्रेरणेशिवाय दुसरी प्रेरणा म्हणजे त्यांना आदिवासी समाजाबद्दल, त्यांच्या आपल्या समाजातील माणसांबद्दल अपार करुणा आणि प्रेम होते.

जागतिकीकरणाच्या रेटयामधे बोलीभाषां-सोबतच प्रमाण भाषांचीही काय दुरवस्था झाली आहे याची पूर्ण कल्पना भुजंग मेश्राम यांना होती. दिवसेंदिवस जगातल्या आदिवासींची संख्या घटते आहे, त्यांच्यातले अनेक समूह त्यांच्या भाषांसकट, त्यांच्या संस्कृतीसकट अक्षरश: लुप्त होत आहेत, डोळयासमोर एक एक बोलीभाषा मृतवत होत आहे, या भीषण परिस्थितीची त्यांना पूर्ण जाणीव होती. आपल्या समग्र लेखनातून ते या भयावह परिस्थितीशी लढत होते.
...

आदिवासी साहित्याबाबत प्रतिपादन करताना अनेक मूलभूत महत्त्वाचे मुद्दे भुजंग मेश्राम यांनी उपस्थित केले आहेत. आदिवासी हे मानवी अवस्थेचे प्रतीकात्मक वर्णन असताना आपण ते शोषित या अर्थाने वापरतो असा आक्षेप ते आदिवासी या शब्दाच्या रूढ वापराबाबत घेतात. सोबतच आदिवासी हे मागासलेले हिंदू नव्हेत असे स्पष्ट विधान ते करतात. आदिवासींची मुळं शोधण्याच्या त्यांच्या प्रवासाच्या अनुभवांवर आधारित प्रतिपादन करताना ते म्हणतात की 'आम्ही इतिहासात कुठेही नाही'. आदिवासींचा इतिहास कुणी लिहिला नाही. एवढेच नव्हे तर जगभरात आदिवासींच्या सृजनकथा ज्या मौखिक परंपरेतून कथन केल्या जातात त्यांना अभिजात साहित्याचा दर्जा देण्याची उदारतादेखील प्रमाण भाषेच्या व्यवस्थेने दाखवली नाही. त्यांना दंतकथांचा किंवा लोकसाहित्याचा वेगळा दर्जा दिला गेला याकडे भुजंग मेश्राम आपले लक्ष वेधून घेतात. अगदी अलीकडच्या काळातील संदर्भ देताना देशातील भाषानिहाय राज्यव्यवस्थेच्या स्थापनेच्या घटनेचा ते उल्लेख करतात. या भाषानिहाय प्रांतरचनेत कुठल्याही आदिवासी भाषेला मग ती गोंडी असो, संथाली असो, कुडुख असो किंवा मुंडारी असो, स्थान मिळाले नाही. राज्यरचनेत तर सोडाच, जिल्हारचनेतदेखील आजही आदिवासी भाषांचा विचार केला जात नाही. त्यामुळे ज्या भागात आदिवासी लोक बहुसंख्येने राहात होते तो भाग वेगवेगळया राज्यांमधे वाटला गेला आणि परिणामत: आदिवासी त्या त्या राज्यात अल्पसंख्य झाले. याचे अधिक विश्लेषण करताना भुजंग मेश्राम म्हणतात की आदिवासींमधील टोळीजीवन, संचयवृत्तीचा अभाव, एकत्र येऊन राहण्यापेक्षा गटागटाने राहण्याची वृत्ती, वेगवेगळया बोलीभाषा आणि त्यात एकमेकांच्या बोलीभाषेत आदानप्रदान नाही अशा कारणांमुळे आदिवासींचा आवाज क्षीण राहिला.

समकालीन आदिवासी साहित्याची मीमांसा करताना त्यांनी आदिवासी साहित्याला मर्यादा पाडणाऱ्या गोष्टींचे कुंपण स्पष्टपणे दाखवले आहे. सोबतच ते ओलांडून जाण्यासाठी आदिवासी लेखकाने काय करावे याचे दिग्दर्शनही केले आहे. बोलीभाषेतील शिक्षणाचा अभाव या महत्त्वाच्या मुद्दयावर त्यांनी बोट ठेवले आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम आदिवासी समाजाच्या आणि आदिवासी संस्कृतीच्या अस्तित्वाला कसे नख लावत आहेत हे देखील स्पष्ट केले आहे.
.....

आदिवासी साहित्य आणि दलित साहित्य यातील अनुबंधाची स्पष्ट कल्पना भुजंग मेश्राम यांना होती. अत्यंत कृतज्ञपणे ते लिहितात, 'आदिवासी लेखकांसमोर प्रेरणेचे निमित्त म्हणून दलित लेखक डोळयासमोर होते. त्यामुळे आदिवासी लेखक लिहू लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील शाक्तिंस्थळांमुळे आदिवासी साहित्याला दिशादिग्दर्शन मिळाल्याने आदिवासी साहित्याची मूलभूत प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत.' सोबतच आदिवासी साहित्याच्या पृथकपणाची गरजही ते पोटतिडकीने मांडत असल्याचे दिसून येते. 'दलित या व्यापक अर्थी सर्वहारा समाजाला समानार्थी म्हणून वापरल्या जाणाऱ्या दलित जीवनाचा एक भाग आदिवासी समाजाचा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. परंतु आदिवासी सामाजिक जीवनातील सांस्कृतिक वैशिष्टयांचे पदर वेगळे आहेत. दलित व आदिवासी साहित्याचे उद्दिष्ट एक असले तरीही दलित साहित्याचा प्रदेश व्यापक करण्याच्या दृष्टीने आदिवासी साहित्याचा प्रारंभ आवश्यक ठरतो,' असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
....

आदिवासी साहित्याबद्दल व्यापक आणि सर्वसमावेशक विचार करून भुजंग मेश्राम थांबत नाहीत, तर ते त्यांच्या मातृभाषेबद्दलचा, 'गोंडी'बद्दलचा आपला सूक्ष्म भाषाविचारही त्यांच्या या ग्रंथातील संशोधनपर निबंधांमधून मांडतात. जगातील काही आदिवासी समूहांचा अभ्यास समाजशास्त्रासारख्या विषयात झालेला दिसून येतो. गोंडी संस्कृतीची मुळे शोधण्यासाठी त्यामुळेच भुजंग मेश्राम गोंडी भाषेतील म्हणी, वाक्प्रचार, लोकगीते याकडे वळतात आणि त्यातून सांस्कृतिक संदर्भ शोधून गोंडी लोकजीवनाचा शोध घेतात. गोंडांच्या धार्मिक जीवनाशी संबंधित म्हणींमधून त्यांना गोंडांच्या देवदेवतांबाबतच्या कल्पना दिसतात, नीतिमूल्यांबाबत, कष्टाळूपणाबाबत, प्रामाणिक राहण्याबाबत, शारीरपणाबाबत अनेक विचार म्हणींमधून व वाक्प्रचारांमधून शोधून ते गोंडांच्या जीवनमूल्यांना अधोरेखित करतात. लोककथा, पुराणे, कहाण्या, गीते, दंतकथा या साऱ्यांमधून प्रत्यक्ष लोकजीवनातले संदर्भ देत भुजंग मेश्राम आपल्यापुढे गोंडी संस्कृतीचे पदर त्यांच्या बारकाव्यांसकट उलगडून दाखवतात.

आदिवासी समाजाच्या दु:स्थितीचे वर्णन करणारे भुजंग मेश्राम त्यातल्याच एका समूहाचे सूक्ष्म निरीक्षण त्यातल्या गोडव्यासह, जगण्यातील निर्मळपणासह, नीतिकल्पनांसह, अद्भुतरम्यतेसह, अस्मिताभानासह अत्यंत संवेदनशीलतेने मांडतात. गोंडांबाबतचे समाजशास्त्रीय संशोधनदेखील केवळ त्यांचे राहणीमान, वेशभूषा, नृत्ये इत्यादींबाबत वरपांगी झालेले असून खोलवरच्या अभ्यासासाठी गोंडी गोत्रनामांचा, स्थळनामांचा, लोकगीतांचा, भाषेचा अभ्यास होणे गरजेचे आहे व त्यातूनच अद्याप न दिसलेला इतिहास दृष्टिपथात येईल असे मत ते अनुभवांती मांडतात. गोंडी भाषेची स्वत:ची व्यवस्था आहे, व्याकरण आहे, साहित्य आहे, त्याचसोबत प्रभावक्षेत्रही आहे. गोंडीचा वऱ्हाडी या तुलनेने मोठया बोलीभाषेवर काय प्रभाव झाला याचा अभ्यासपूर्ण आलेखच त्यांनी त्यांच्या एका निबंधात मांडलेला आहे. बोलीभाषेच्या तौलनिक साहित्याभ्यासाचा उत्तम नमुना म्हणून या लेखाकडे गांभीर्याने पाहिले जायला हवे. अनेक गोंडी शब्द वऱ्हाडीत जसेच्या तसे आलेले आहेत. काही शब्दांची रूपे वऱ्हाडीत आल्यावर थोडीफार बदललेली दिसतात. व्याकरणाच्या अंगानेही ते गोंडीचा वऱ्हाडीवरील प्रभाव तपासून बघतात. अनेक वऱ्हाडी शब्दांची व्युत्पत्ती गोंडीत दिसून येते हेदेखील त्यांनी सप्रमाण मांडले आहे. त्याहीपलीकडे जाऊन परधानी ही बोली गोंडी व वऱ्हाडीचे अपत्य आहे असे विधान करून त्यावरील स्वतंत्र लेखाचे सूतोवाच त्यांनी करून ठेवले आहे. गोंडी भाषेबद्दलच्या लेखांचा हा विभाग आदिवासी साहित्याच्या अभ्यासकांकरिता वस्तुपाठ तर आहेच शिवाय तो आदिवासी समाजजीवनाच्या भाषाशास्त्रीय व मानववंशशास्त्रीय अभ्यासकांनाही वैचारिक दिशा देणारा आहे.
...........

भुजंग मेश्राम यांच्या प्रस्तुत ग्रंथातून त्यांचा आदिवासी अस्मिताविषयक आग्रह प्रकर्षाने दिसून येतो. मात्र कुठेही त्यांनी भावनिक आवाहन केलेले नाही हे या आग्रहाचे अनन्यत्व आहे. त्यांनी वैचारिक मांडणी करून वैचारिक आवाहन केले आहे. आदिवासी ही मानवी समाजाच्या स्थित्यंतराच्या साखळीतील एक अवस्था आहे. यातून बाहेर यायचे आहे, मात्र सामाजिक परिवर्तन घडत असताना सांस्कृतिक संचित गमावायचे नाही. आदिवासी समाजात होत असलेल्या स्थित्यंतराबाबत ते कुठेही गतकातर होत नाहीत. स्वत: जन्माने आदिवासी समाजातून आल्याने सामाजिक परिवर्तनाची गरज लक्षात घेऊन ते परिवर्तनवादी भूमिका घेतात.

आदिवासी भाषा बोलणारा समाज जर आपल्या अस्मितेसह जिवंत राहिला तर त्याची भाषा जिवंत राहील आणि त्याची संस्कृती टिकेल याची पूर्ण कल्पना ठेवून भुजंग मेश्राम आपला भाषाविषयक अभ्यास आपल्यापुढे मांडतात. भारतीय समाजाची सांस्कृतिक वीण बहुभाषिकत्वाच्या धाग्यांनी बनलेली आहे. या भाषा पृथक असल्या तरीही त्या एकमेकांशी घट्ट विणल्या गेलेल्या आहेत. यातील धागे जर नाहीसे व्हायला लागले तर ही वीण विसविशीत होऊन, निर्माण होण्याकरता शतकानुशतके लागलेले हे वस्त्र फाटायला वेळ लागणार नाही. हे लक्षात घेतल्यास भुजंग मेश्राम यांच्या विचारांच्या मांडणीची सयुक्तिकता आपल्या लक्षात येते. नवे भाषाभान आणि नवे समाजभान देणारे भुजंग मेश्राम यांचे हे लेखन अभ्यासकांसोबतच सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य वाचकांच्या जाणिवा समृध्द करणारे आहे.

Saturday, November 29, 2014

वारस एकलव्याचा मी

वारस एकलव्याचा मी...
by राजू ठोकळ

मूलनिवासी गडी रांगडा
सातपुड्याचे गुणगान मी
तापी नर्मदा भीलवाडचा
वारस एकलव्याचा मी...

दंडकारण्याच्या वैभवातील
शबरीचा बटवा मी
शबर, किरात, निषाद सांगे
वारस एकलव्याचा मी...

तपकिरी वर्ण, जबड़ा हसरा
मानवतेचा गोल चेहरा मी
पीळदार शरीर हरणासंगे
वारस एकलव्याचा मी...

साडी चोळी आखुड पदर डोई
भिलाट्यान्चा शृंगार मी
लाकडाची मोळी बोले
वारस एकलव्याचा मी...

मावची, गामीत, गावितांचे
शेतीभोवतालचे गाव मी
बरडे भिल्ल जागल्यांचा
वारस एकलव्याचा मी...

पाडवींच्या वास्तव्याचा
सदाबहार पहाड़ मी
वळवींच्या आदिम कलांचा
वारस एकलव्याचा मी...

वसाहती गावच्या भावनांचा
वसावा, तडवी मी
गावकुसाच्या माय-बापाचा
वारस एकलव्याचा मी...

निष्णांत तीरंदाजीची
बळीराजाची जमात मी
ब्रिटिशांनी कलंकित केलेला
वारस एकलव्याचा मी...

झाडपाला कंदमुळान्चे गुण
मासेमारीत निपुण मी
निशाणा तीर कामठ्याचा
वारस एकलव्याचा मी...

महुआच्या तेलाचा ठेवा
फळान्ची बेगमी मी
गोड मधाचा रानमेवा
वारस एकलव्याचा मी...

पाच महिण्याच्या गर्भपाताचा
गुन्ह्याच्या शिक्षेचा रीवाज मी
सुईणीचे मात्रुतुल्य बाळन्तपण
वारस एकलव्याचा मी...

यहामोगीच्या श्रध्येचा
निसर्ग अविष्कार मी
हिवारीयाच्या आशीर्वादाचा
वारस एकलव्याचा मी...

आदिवासी लेकरांचा
ज्ञानभांडार मी
विज्ञान युगातील पाखरांचा
वारस एकलव्याचा मी...

बाणावरती खोचलेल्या प्रेमाची
सर्वांगसुंदर कविता मी
आदिवासी नृत्याविष्कारांचा
वारस एकलव्याचा मी...

तंट्या मामाच्या यल्गाराची
क्रांतीची ज्वाला मी
आदिवासी उलगुलानाचा
वारस एकलव्याचा मी...

आदिम अस्तित्व जपणारा
भिल्लवीर शिल्पत राजा मी
माती माझी राखणार
वारस एकलव्याचा मी...

धर्मांध नीच द्रोणाचे
उड़वणार शीर मी
घुसखोर आर्य गाडणार
वारस एकलव्याचा मी...

वाडी वस्ती पाड्यातील
आंदोलनाची धार मी
तलवार तळपती लेखणी
वारस एकलव्याचा मी...

रंजल्या गांजल्या पीडितांचा
विद्रोही आदिवासी मी
समता न्याय बंधुत्ववादी
वारस एकलव्याचा मी...

©www.rajuthokal.com
®www.jago.adiyuva.in

Monday, November 24, 2014

माझा आदिवासी रंग

माझा आदिवासी रंग
by raju thokal

जीवनाच्या प्रवासात
क्षणभर मी थांबलो
विचारांशी थोड़ा भांडलो...
घटकाभर ती भयाण शांतता
विश्वासासोबत चालली
चालण्याच्या या मार्गात
पण का कुणास ठावुक
मनात शंकेची पाल चुकचुकली
दबक्या पावलांच्या पाठलागाची
स्पंदनं मी अनुभवली
अगदी सहज वळुन मी बघितले
या माझ्या नेत्र नयनांनी
हेरले मी अचूक त्याला
सजला होता नक्षत्रांनी
यातच होता मातीचा सुगंध
यातच होती माझी ओळख
यात दिसला माझा ध्यास
माझ्या जगण्याचा श्वास
"माझा  आदिवासी रंग"

©www.rajuthokal.com

राजू ठोकळ

AYUSH! Adivasi Yuva Shakti

www.jago.adiyuva.in

माझीया गावात...

माझीया गावात
by Raju Thokal

माझीया गावात
होती प्रकृती नांदत
माझीया घरात
होती संस्कृती आनंदात
प्रगतीच्या नादात
हरवले सारे 'मी'पणात

माझीया गावात
होते विचार नांदत
माझीया घरात
होते आचार आनंदात
योजनांच्या नादात
हरवले सारे भ्रष्टाचारात

माझीया गावात
होती माणुसकी नांदत
माझीया घरात
होती आपुलकी आनंदात
संगणकाच्या नादात
हरवले सारे मायाजालात

माझीया गावात
होता निसर्ग नांदत
माझीया घरात
होती तुळस आनंदात
सिमेंटच्या नादात
हरवले सारे बंगल्यात

माझीया गावात
होती कणसरी नांदत
माझीया घरात
होते सणवार आनंदात
प्रदुषणाच्या नादात
हरवले सारे कँलेंडरात

माझीया गावात
होते साहित्य नांदत
माझीया घरात
होते संगीत आनंदात
मोबाईलच्या नादात
हरवले सारे फेसबुकात

माझीया गावात
होती जनता नांदत
माझीया घरात
होती ममता आनंदात
स्पर्धेच्या नादात
हरवले सारे पैशात

माझीया गावात
होते संस्कार नांदत
माझीया घरात
होते शब्दालंकार आनंदात
इंग्रजीच्या नादात
हरवले सारे गुणपत्रकात

माझीया गावात
होत्या परंपरा नांदत
माझीया घरात
होत्या कला आनंदात
कारखानदारीच्या नादात
हरवले सारे शहरात

माझीया गावात
होती फळे-फुले नांदत
माझीया घरात
होती मुले आनंदात
टिव्हीच्या नादात
हरवले सारे कार्टूनात

माझीया गावात
होती ऊब घोंगडीची नांदत
माझीया घरात
होती धांदुक फड़की आनंदात
फँशनच्या नादात
हरवले सारे साडीच्या पदरात

माझीया गावात
होते स्वातंत्र्य नांदत
माझीया घरात
होती क्रांती आनंदात
जातीपातीच्या नादात
हरवले सारे आदिवासी वीर इतिहासात

माझीया गावात
होता मूलनिवासी नांदत
माझीया घरात
होता आदिवासी आनंदात
घटनेच्या नादात
हरवले सारे आरक्षणात

©www.rajuthokal.com

राजू ठोकळ

आयुश!आदिवासी युवा शक्ती

माझ्या कविता

image

Saturday, November 22, 2014

आम्ही आदिवासी

आम्ही आदिवासी
by raju thokal

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
निसर्ग सौंदर्याचे पूजक आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
अथांग सागराच्या लाटा आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
वारली चित्रकलेतील वास्तव आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
कड़ेकपारित जगण्याची धडपड आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
कातळातुन झेपावणारा आत्मविश्वास आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
स्वातंत्र्यासाठी सांडलेले कण कण रक्त आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मुलनिवासी
कनसरीच्या गितातिल सुर आम्ही 

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
वाघ बारसीचे गोपाळ आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मुलनिवासी
मुखवट्यान्च्या नाचाचा बोहडा  आम्ही 

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
रानात बहरलेली स्वच्छंदी फुले आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
 कपाळी माती घामाचे लेकरू आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
पावसाळा झेलणारी घोंगडीची ऊब आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
नशिबाच्या छाताडावर फुललेला संसार आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
भातलावणीचा चिखल आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
बोली भाषेचा अभिमान आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
सर्व संस्कारांचे मुळ आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
ख-या इतिहासाची स्पंदनं आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
या भूमिचे नायक आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
या धरतीचे मालक आम्ही

©www.rajuthokal.com

मस्त झोपलाय आदिवासी

मस्त झोपलाय आदिवासी...
by Raju Thokal

मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
संस्कृती जतनाचे विचार इथे फाडफाड बोलू नका
सिमेंटच्या जंगलातील आदिवासी रानात आणू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

ठेकेदार माजलेत, माजू दे
आदिवासी बहिणींवर हात टाकत आहेत, टाकू दे
अंगावरचे पांघरून उगाचच ओढू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

खायला नसले तरी चालेल...योजना खा
समजत नसले तरी बेहतर...पैसे घेवून मतदान करती
योजनांसोबत प्रगतीची उगा स्वप्ने रंगवू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

आश्रमशाळेत नाव पोरगं घरीच....वाईट काय
पीत रहा दिवस आणि...नाईट काय
सारेच धुंद आहेत ग्लास त्यांचे फोडू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

पाणी-पुरवठा योजना नेत्याच्या घरीच.....पाणी पिवूच नका
आरोग्य केंद्र दारी, पण डॉक्टर शहरी....आजारी पडू नका
मरणाचीच वाट पहा उगा आदिवासी जोडू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

प्रगती आमच्या नेत्यांचीच....स्वतासाठी काही मागू नका
आदिवासी खातेच आम्हाला खातंय....दुख मानू नका
कंबराचे सोडून आता डोक्याला बांधू  नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

विकासासाठी आक्रमक आग्रही बनू नका
नाराजीने नक्षलवादाचा मार्ग तुम्ही निवडू नका
एकी आणि नेकीचे बळ आहे उद्विग्न तुम्ही होवू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

©www.rajuthokal.com

raajoo thokal

AYUSH । Adivasi Yuva Shakti

यल्गार

यल्गार...
by raju thokal

मन माझे सदैव धावते
रानभरारी वा-यागत
कधी या छतावर
तर कधी त्या छाताडावर
विश्वास नसला जरी या जगाला
असा विश्वास जपतोय मनातला...

आयुष्याच्या वाटेवर
काट्या-कुट्यातुन शोधीत आशा
रानावनांतील जीवांसाठी जगणं
अखेरच्या श्वासाचं हेच मागणं
अट्टहास जरी वाटे हा जगाला
असा अट्टहास जपतोय मनातला...

साक्ष ठेवुनी निसर्गाची
प्रेमाचे अंकुर सदा सजवलेत
नकोत आभूषणं शब्दांची
साथ हवीय नवक्रांतीची 
निर्धार वाटे जरी पोरखेळ जगाला
असा निर्धार जपतोय मनातला....

माणसांच्या ह्रदयातील श्रीमंतिला
वस्त्रांचा इथे दुर्मिळ साज
संस्कृतीने नटलेला आहे समाज
नाचतो तारप्याच्या सुर गंधात
हा आदिवासी परका या जगाला
असा आदिवासी जपतोय मनातला....

नसताना कोणताच गुन्हा
खोट्या जबानीचा सपाटा
कायद्याच्या या दरबारात
हरवला मूलनिवासी घटनेच्या पानांत
जरी न्यायाची फिकिर  नसे जगाला
असा न्याय जपतोय मनातला....

पारतंत्र्याच्या काळ्या ढगांखाली
आदिम इतिहास रक्तरंजित गौरवशाली
भडव्यांच्या कलमने पुसला
अभिमान क्रान्तिविरांचा वैभवशाली
जरी या यल्गाराची जाण नसे जगाला
असा यल्गार जपतोय मनातला....

©www.rajuthokal.com

Friday, November 21, 2014

झलकारी बाई जयंती दिवस

२२ नोव्हेंबर
               मित्रहो

विरांगना झलकारीबाई जयंती दिन

     झाशीच्या पळपुट्या राणीऐवजी रणांगणात तिच्या वेशात लढलेली आदीवासी कोरी जमातीत जन्मलेली शुर मुलनिवासी महीला योद्धा...

     लोकगीतांमधे आजवर तिचा गौरवशाली इतिहास आदीवासी बंधुंनी जतन करुन ठेवला नसता तर खोट्या कपोलकल्पीत भाकड कथेला तुम्ही आम्हीही कवटाळून बसलो असतो...

     पण नियतीच्या मनात काही औरच होते...

     लक्षमीबाईला मदतीशिवाय साधे घोड्यावार देखील बसता येत नव्हते, लढणे तर दूरच. तिने किल्ल्याच्या तटावरुन खाली घोड्यावर उडी मारल्याची थाप ब्राम्हणी ईतिहासच मारु शकतो...

     पण ३ महीने इंग्रजांशी किल्ला लढवून प्राणार्पण करणा-या झलकारीबाईचा पराक्रम लिहायला मात्र त्यांच्या हातांना लकवा मारतो. त्यासाठी बहुजनांमध्येच इतिहासकार जन्माला यावा लागतो...

     हा दबलेला आदिवासी इतिहास बाहेर येवूनसुद्धा आज सर्वमान्य नाही. शूर स्त्रीला आजही झलकारीबाईची ऊपमा दिली जात नाही...

    "खुब लडी वो मर्दानी थी
      लक्ष्मी नही झलकारी थी"

     असं म्हणण्याची ही हिम्मत आमच्यात कधी येणार मित्रहो...

जयंती दिनी विरांगना झलकारी बाईंना मानाचा मुजरा.....!!!

"आदिवासींचा इतिहास जगासमोर आणण्याची जबाबदारी आदिवासींची आहे. त्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे."
  -आदिवासी आवाज

image

Tuesday, November 18, 2014

अगुआ बनने की कोशिश मत करना

*अगुआ बनने की कोशिश मत करना *

मुद्दा तुम्हारा,मंच तुम्हारा
और भीड़ भी तुम्हारी ही
लेकिन अगुआ बनने का कभी
मत करना कोशिश तुम अपने समाज का
अगुआ बनने का हक नहीं है तुम्हारा
दोपहर की तपती धूप में
नाचना-गाना होगा तुम्हें
और धोकर पांव हमारा
पहनाना फूलों का हार हमें
यह नियति हैं तुम्हारी
तुम्हें सुनना होगा दर्द अपना
पवित्र मुख से हमारा
और गलत व्यख्यान को भी हमारा
लगाना होगा दिल से तुम्हें
तालियां भी बजाना होगा तुम्हें
भीख मांगकर पैसा बटोरोगे तुम
और मुट्ठीभर चावल भी लाना होगा तुम्हें ही
लेकिन याद रखना
सिर्फ़ तालियों से काम नहीं चलेगा
करना जिंदाबाद भी
यह हक है हमारा
तुम्हारे दुख-दर्द और पीड़ा को
शब्दों में बयान कर
दुनिया में बटोरेंगे यश हम
और बनेंगे मसीहा भी तुम्हारा
बनने की अगुआ समाज का अपने
कल्पना मत करना कभी
बना देंगे तुम्हें हम
अपराधी,भ्रष्टाचारी और देशद्रोही
तुम्हारी भाषा हमें नहीं आती है तो क्या
किताबों में भी तुम्हारा
होगा नाम हमारा ही
पाप की गंगोत्री में डूबकर भी
अगुआ होंगे हम
पवित्र समाज का तुम्हारा
अगुआ बनने की कभी कोशिश मत करना
अगुआ बनने का हक नहीं है तुम्हारा।

-ग्लैंडसन डुंगडुंग जी की कविता

वसुदेव कुटुंबकम या संकल्पनेत आदिवासी धर्म

दिनांक १६ नोव्हेंबर २०१४ पुणे येथील वसुधैव कुटुंबकम तर्फे आयोजित जागतिक शांतता आणि एकात्मता परिषद (विषय - धर्म, मातृभूमी, महिला) मध्ये आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करताना आप. अशोकभाई चौधरी यांनी मांडलेले काही ठळक मुद्दे थोडक्यात. कृपया सर्वांनी एकदा वाचुन नक्की विचार करावा.

१) private  ownership (खाजगी मालकी ) :
अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला कि,आदिवासी समाजात खाजगी मालकी ची संकल्पना कधी रुजली नव्हती, म्हणून कधी आदिवासी साम्राज्ये फारशी बनली नाहीत, जी बनली ती स्वरक्षणार्थ बनली. याला कारण असे कि संपत्ती व खाजगी मालकी बनवली, तर तिचे रक्षण, वयक्तिक इर्षा, स्पर्धा,स्वार्थ, मोह,  हिंसा उदयास येते. आदिवासी समाज मात्र या पासून अलिप्त राहून अजुनी सामाजिक एकात्मता, परस्पर सहकार्य, हे जीवन शैलीत सहज येते.

पुढे जावून श्री. अशोकभाई हा मुद्दा आणखी विस्तारत म्हणाले कि,आदिवासींनी संपत्ती स्वतःजवळ साठवून न ठेवता ते समाजात वाटून घेत असत. आणि म्हणून जर संपत्तीच नाही तर गरीब श्रीमंत हा भेदभाव देखील आदिवासींमध्ये रुजला नाही. समानता हा आदिवासी समाजाचा सर्वात मोठा पाया हा याच गोष्टीमुळे ठरतो.

          संपत्ती नाही म्हणून कधी institutions बनली नाहीत. सामाजिक, आर्थिक कोणत्याच प्रकारच्या संस्था विकसित झाल्या नाहीत. व्यापार, व्यवहार, गरजे पेक्षा जास्त जमा करणे याची गरजच कधी आदिवासींना पडली नाही. जे काही व्यवहार व्हायचे ते सर्व एकमेकांवरील विश्वासाच्या आधारावर व्हायचे.

२) self governance system (स्वशासन प्रणाली)
          दुसरा मुद्दा हा खूप महत्वाचा मांडला. अशोकभाई म्हणतात कि, "आदिवासी समाज जरी समूहा समूहाने राहत असला तरी त्यांनी स्वताची self governance system (स्वशासन प्रणाली ) त्यांनी विकसित केली आहे. या प्रणाली अंतर्गत समाजाच्या छोट्या मोठ्या समस्या आपापसात चर्चा व समेट घडवून सोडवल्या जात , त्यांचे स्वतःचे काही नियम व कायदे आहेत,त्यामुळे वेगळ्या एखादया किंवा बाहेरच्या न्यायप्रणालीची आदिवासींना कधी गरज पडली नाही.

३) स्वावलंबन       
          तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला गेला तो म्हणजे स्वावलंबन , हा मुद्दा मांडताना अशोकभाई म्हणतात कि आमच्या मुलांना कधी विज्ञान शिकवायला वा  तंत्रञान  शिकवायला विशेष प्रणालीची आवश्यकता भासली नाही. कारण आमची मुले सामुहिक होवून काम करणारा समाज बघून सामुहीकता,संघटीतपण हे गुण शिकतात. दैनदिन जीवनातून त्यांनी विज्ञान व तंत्रञान शिकलेय.

          आदिवासी समाज हा अत्यंत स्वावलंबी , शिस्तबद्ध आणि स्वतःची एक शाषणपद्धती विकसित करून चालवणारा असा स्वयंभू समाज आहे .

   सर्व समाजाला उद्देशून बोलताना अशोकभाईनी आदिवासी समाजाची तत्वे सोडून जर आपण चालू पडलोय आणि यामुळे आपण स्वताचे नुकसान करून घेतोय सर्व मानवजातीचे नुकसान करतोय असा महत्वाचा इशारा दिला,ते म्हणाले कि आज आपण सर्वजन समाजात विविध तत्वांची मांडणी करतो मात्र वागतोय त्याच्या अगदी विरुद्ध! प्रत्येक जन आज ध्येय पूर्तीच्या मागे लागलाय ,जास्ती मिळवण्याच्या मागे लागलाय आणि जास्ती मिळवण्यासाठी एकमेकांशीच स्पर्धा करू लागलोय स्पर्धेतून द्वेष मत्सर निर्माण होवून मानव जातीमध्ये विष पसरत आहे हे जर टाळायचे असेल तर आदिवासी तत्वे आत्मसात करणे खूप गरजेचे आहे . "मला वाटते कि या जगाचे पुन्हा retribalisation व्हावे असे मला वाटते" असे अशोक भायींनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा एकच गजर झाला.

विज्ञानाचा वापर हा एकमेकांना जोडायला केला गेला पाहिजे न कि एकमेकांना मारायला हे सांगायला ते विसरले नाहीत.  भाषण संपवताना मात्र त्यांनी असा मुद्दा उपस्थित केला कि सर्वांना विचार करायला भाग पाडले. इंगजी आणि हिंदीमधून भाषण देताना म्हणाले कि, we all  believe Darvin's principle right?" म्हणजे आपण सर्व जन डार्विन च जीवउत्क्रांतीचा सिद्धांत मानतो त्यावर विश्वास ठेवतोय ना. (सभागृहात  होकारार्थी माना  डोलावल्या गेल्या ) या सिद्धांतात म्हटलेय कि माकड (वानर) हे आपले पूर्वज होते आणि ते आपण अभिमानाने मान्य करतो.  मग आपण हे का मान्य करत नाहीत कि आदिवासी हे आपल्या पूर्वजांचे पण पूर्वज होते .?"( सभागृत टाळ्या वाजू लागल्या मात्र त्याच बरोबर उपस्थित पण विचारात पडले  हे सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते)

सदर चे भाषण बघण्या साठी येथे क्लिक करा : http://youtu.be/HJHFe_vTtaA 

www.jago.adiyuva.in

"माकड हे मानवाचे पूर्वज आहेत हा डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिध्दांत सर्वजन मोठ्या अभिमानाने मान्य करतात मग आदिवासी हे येथील मुळ रहिवासी आहेत हे का मान्य केले जात नाही?"
  -अशोकभाई चौधरी

Monday, November 17, 2014

हा उजेड आदिवासी मनातला

उजेड आदिवासी मनातला...
-राजू ठोकळ

नदी    नाल्यांच्या    प्रवाहात
खेकड़ी दगडाखाली शोधताना
अनेकदा अडकली बोटे
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

करवंदाच्या जाळीमधली
काळी मैना तोड़ताना
अनेकदा रुतले काटे
तरी मज वाटे हवा हवा
हां उजेड आदिवासी मनातला

गुडघे गुडघे चिखलात
भात लावणी करताना
अनेकदा झोडपले पावसाने
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

कौलारू पहाड़ी घरात
कुडाच्या भिंती सारवताना
अनेकदा शेणही गेले तोंडात
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

सोन-पिवळ्या शेतात
पिकांची कापणी करताना
अनेकदा रक्ताळली बोटे
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

वडिलांच्या कोपरीच्या खिशात
घामाची दमड़ी शोधताना
अनेकदा रीते झाले हात
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

घराच्या हक्काच्या अंगणात
रात्री चांदण्या मोजताना
अनेकदा स्वप्नांची सोडली साथ
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

दुनियेचा महासागरात
भविष्याची स्वप्ने रंगवताना
अनेक खाल्ल्या ठेचा
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

©www.rajuthokal.com

राजू ठोकळ