Saturday, November 29, 2014

वारस एकलव्याचा मी

वारस एकलव्याचा मी...
by राजू ठोकळ

मूलनिवासी गडी रांगडा
सातपुड्याचे गुणगान मी
तापी नर्मदा भीलवाडचा
वारस एकलव्याचा मी...

दंडकारण्याच्या वैभवातील
शबरीचा बटवा मी
शबर, किरात, निषाद सांगे
वारस एकलव्याचा मी...

तपकिरी वर्ण, जबड़ा हसरा
मानवतेचा गोल चेहरा मी
पीळदार शरीर हरणासंगे
वारस एकलव्याचा मी...

साडी चोळी आखुड पदर डोई
भिलाट्यान्चा शृंगार मी
लाकडाची मोळी बोले
वारस एकलव्याचा मी...

मावची, गामीत, गावितांचे
शेतीभोवतालचे गाव मी
बरडे भिल्ल जागल्यांचा
वारस एकलव्याचा मी...

पाडवींच्या वास्तव्याचा
सदाबहार पहाड़ मी
वळवींच्या आदिम कलांचा
वारस एकलव्याचा मी...

वसाहती गावच्या भावनांचा
वसावा, तडवी मी
गावकुसाच्या माय-बापाचा
वारस एकलव्याचा मी...

निष्णांत तीरंदाजीची
बळीराजाची जमात मी
ब्रिटिशांनी कलंकित केलेला
वारस एकलव्याचा मी...

झाडपाला कंदमुळान्चे गुण
मासेमारीत निपुण मी
निशाणा तीर कामठ्याचा
वारस एकलव्याचा मी...

महुआच्या तेलाचा ठेवा
फळान्ची बेगमी मी
गोड मधाचा रानमेवा
वारस एकलव्याचा मी...

पाच महिण्याच्या गर्भपाताचा
गुन्ह्याच्या शिक्षेचा रीवाज मी
सुईणीचे मात्रुतुल्य बाळन्तपण
वारस एकलव्याचा मी...

यहामोगीच्या श्रध्येचा
निसर्ग अविष्कार मी
हिवारीयाच्या आशीर्वादाचा
वारस एकलव्याचा मी...

आदिवासी लेकरांचा
ज्ञानभांडार मी
विज्ञान युगातील पाखरांचा
वारस एकलव्याचा मी...

बाणावरती खोचलेल्या प्रेमाची
सर्वांगसुंदर कविता मी
आदिवासी नृत्याविष्कारांचा
वारस एकलव्याचा मी...

तंट्या मामाच्या यल्गाराची
क्रांतीची ज्वाला मी
आदिवासी उलगुलानाचा
वारस एकलव्याचा मी...

आदिम अस्तित्व जपणारा
भिल्लवीर शिल्पत राजा मी
माती माझी राखणार
वारस एकलव्याचा मी...

धर्मांध नीच द्रोणाचे
उड़वणार शीर मी
घुसखोर आर्य गाडणार
वारस एकलव्याचा मी...

वाडी वस्ती पाड्यातील
आंदोलनाची धार मी
तलवार तळपती लेखणी
वारस एकलव्याचा मी...

रंजल्या गांजल्या पीडितांचा
विद्रोही आदिवासी मी
समता न्याय बंधुत्ववादी
वारस एकलव्याचा मी...

©www.rajuthokal.com
®www.jago.adiyuva.in

No comments:

Post a Comment