Monday, November 17, 2014

हा उजेड आदिवासी मनातला

उजेड आदिवासी मनातला...
-राजू ठोकळ

नदी    नाल्यांच्या    प्रवाहात
खेकड़ी दगडाखाली शोधताना
अनेकदा अडकली बोटे
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

करवंदाच्या जाळीमधली
काळी मैना तोड़ताना
अनेकदा रुतले काटे
तरी मज वाटे हवा हवा
हां उजेड आदिवासी मनातला

गुडघे गुडघे चिखलात
भात लावणी करताना
अनेकदा झोडपले पावसाने
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

कौलारू पहाड़ी घरात
कुडाच्या भिंती सारवताना
अनेकदा शेणही गेले तोंडात
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

सोन-पिवळ्या शेतात
पिकांची कापणी करताना
अनेकदा रक्ताळली बोटे
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

वडिलांच्या कोपरीच्या खिशात
घामाची दमड़ी शोधताना
अनेकदा रीते झाले हात
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

घराच्या हक्काच्या अंगणात
रात्री चांदण्या मोजताना
अनेकदा स्वप्नांची सोडली साथ
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

दुनियेचा महासागरात
भविष्याची स्वप्ने रंगवताना
अनेक खाल्ल्या ठेचा
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

©www.rajuthokal.com

राजू ठोकळ

No comments:

Post a Comment